भारताच्या प्रगतीत हिंदी भाषेचे मोठे योगदान – प्रा. एस. बाबाराव

भारताच्या प्रगतीत हिंदी भाषेचे मोठे योगदान - प्रा. एस. बाबाराव

मुखेड (गोविंद काळे) : कोणतीही भाषा ही आपल्या माध्यमातून समाजाचा विकास साधण्याचा प्रयत्न करीत असते. देशात घडणाऱ्या विविध चळवळींना भाषेमुळे बळ मिळत असते.भारतीय स्वातंत्र्यासाठी हिंदीने मोठे योगदान दिले आहे. महात्मा गांधींनी राष्ट्रभाषा हिंदीसाठी मोठे योगदान दिले. १४ सप्टेंबर १९४९ ला राज्यघटनेने हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा दिला. हिंदी दिवस हा १९५३ पासून साजरा केला जातो. हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा असला तरी इंग्रजीचे महत्त्व आजही अधिक प्रमाणात पाहावयास मिळते. भारताच्या प्रगतीत हिंदी भाषेचे मोठे योगदान आहे असे प्रतिपादन ग्रामीण (कला, वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालय वसंतनगर,ता. मुखेड जि. नांदेड येथील इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. एस. बाबाराव यांनी प्रस्तुत महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आयोजित हिंदी दिन व महाविद्यालयाचा वार्षिक अंक संस्कारचे प्रकाशन प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना केले.

यावेळी अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हरिदास राठोड म्हणाले की यावर्षी आम्ही हिंदी दिवस हा नावीन्यपूर्ण पद्धतीने साजरा करतो आहोत. त्यात हिंदी या विषयाचे अध्यापन करणाऱ्या प्राध्यापकांचा सन्मान करणे व अहिंदी भाषिक वक्ता निवडून हिंदी भाषेचे महत्व त्यांच्याकडून ऐकणे. भारतात हजारो भाषा बोलल्या जातात. हिंदी ही जगात तिसऱ्या क्रमांकावर बोलली जाणारी भाषा आहे. भारतात सर्वत्र सर्वप्रकारची विविधता पहावयास मिळते. या विविधतेत एकता निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य हिंदी भाषा करते.आपण प्रत्येकांनी आपल्या राष्ट्रभाषेचा सन्मान करायला शिकले पाहिजे.तसेच त्यांनी या वेळी वार्षिकांका संबंधाने ही विचार मांडले.

महाविद्यालयाच्या वार्षिक अंकाचे संपादक प्रा. डॉ.पंडित शिंदे यांनी वार्षिकांका बद्दल सविस्तर मनोगत व्यक्त केले. ते आपल्या मनोगतात म्हणाले की या भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना दुष्काळाचा नेहमीच सामना करावा लागतो. हाच आशय घेवुन आम्ही हा अंक काढला आहे.याची सविस्तर मांडणी या अंकात घेण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला आहे. ह्या कामी संपादक मंडळातील सर्व सदस्यांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. शंकरय्या कळ्ळीमठ यांनी करून कार्यक्रम आयोजनापाठी मागची भूमिका विशद केली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मंच्यावरील मान्यवरांचा सत्कार संपन्न झाला. यावेळी महाविद्यालयाच्या संस्कार वार्षिक अंकाचे प्रकाशन महाविद्यालयाचे उपप्राचार्य अरुणकुमार थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले.

हिंदी दिनाचे औचित्य साधून हिंदी विषयाचे अध्यापन करणारे प्रा. डॉ.गुरुनाथ कल्याण,प्रा. डॉ.रामकृष्ण बदने, प्रा. डॉ. व्यंकट चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला तसेच वार्षिकांक समितीतील वार्षिक अंकाचे संपादक प्रा. डॉ.पंडित शिंदे,प्रा.सूभाष कनकुटे,प्रा. डॉ. नागोराव आवडे, प्रा. डॉ.महेश पेंटेवार,प्रा.गोविंद पांडे आदिंचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मराठी विभागाच्या प्रा.डॉ.सौ. कविता लोहाळे यांनी केले तर आभार रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा.अरुणा ईटकापल्ले यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

About The Author