जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी लसीचे 20 हजार 980 डोसेस प्राप्त
जिल्ह्यातील 17 हजार 824 आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांची माहिती Cowin Portal वर अद्ययावत
लातूर (प्रतिनिधी) : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार लातूर जिल्हयात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. या सज्जतेची पडताळाणी दिनांक 08 जानेवारी 2021 रोजी ड्राय रन प्रात्यक्षिकामार्फत करणयत आलेली आहे.
लातूर जिल्हयात विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर, उपजिल्हा रुग्णालय उदगीर, ग्रामीण रुग्णालय मुरुड, प्राथमिक आरोग्य केंद्र भातांगळी व शहरी आरोग्य केंद्र मंठाळे नगर लातूर या पाच ठिकाणी ड्राय रनची प्रात्यक्षिके करण्यात आली होती.
कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणासाठी अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण पुर्ण करण्यात आले असून सदरील प्रशिक्षणात एकुण 445 लस टोचक व त्यांना मदत करणारे 205 तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रावरील वैद्यकीय अधिकारी व जिल्हास्तरीय अधिकारी यांना प्रशिक्षीत करण्यात आले. पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रात कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार असुन त्यासाठी 17 हजार 824 आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांची माहिती Cowin Portal वर अद्ययावत करण्यात आलेली आहे. जिल्हयात एकूण 68 शितसाठवण केंद्र असुन परंतु सदरील लसीकरणासाठी दि. 16 जानेवारी 2021 रोजी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उद्घाटन करण्यासाठी एकुण 8 लसीकरण केंद्राची निवड करण्यात आलेली आहे. ही केंद्रे पुढीलप्रमाणे.
1.विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर,2) एम.आय.टी. वै. महाविद्यालय, लातूर, 3) विवेकानंद हॉस्पीटल, लातूर, 4) उपजिल्हा रुग्णालय, उदगीर, 5) उपजिल्हा रुग्णालय निलंगा, 6) ग्रामीण रुग्णालय, अहमदपूर, 7) ग्रामीण रुग्णालय, मुरुड, 8) व ग्रामीण रुग्णालय औसा.
या लसीकरण कार्यक्रमासाठी पुणे येथील Serum Institute of India Pune या या कंपनीची Covishield या लसीचे 20980 डोसेस उपसंचालक कार्यालय लातूर यांच्या कडून प्राप्त झाले असुन जिल्हा परिषदेच्या शितसाखळी कक्षामध्ये +2 ते + 8 डिग्री सेल्सीअस तापमानात साठवण्यात आलेली आहे. दिनांक 14 जानेवारी 2021 रोजी उपरोक्त केंद्रावर लस पुरवठा करण्यात येणार आहे.
दिनांक 16 जानेवारी 2021 रोजी सकाळी 9 वाजता प्रत्यक्ष लसीकरणास सुरुवात होणार असुन सायंकाळी 5 वाजेपर्यंत लसीकरण करण्यात येणार असुन 100 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्याचे नियेाजन झालेले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे यांनी दिली आहे.