जनतेच्या प्रश्नांवर आ. बाबासाहेब पाटील यांचा चाकूर तहसील कार्यालयात जनता दरबार
चाकूर (गोविंद काळे) : तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी तहसील कार्यालय, चाकूर येथे आमदार बाबासाहेब पाटील यांनी जनता दरबार भरऊन बैठक घेतली. तसेच राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेचे लाभार्थी असलेल्या रेखा रेवना सोनकांबळे (रा. टाकळगाव ), शेख वेबी जब्बार (रा. महाळंग्रा) व रुकसाना फतरू पठाण (रा. हिंपळनेर) यांना प्रत्येकी 20 हजार रुपयांचा धनादेश वाटप करण्यात आला. त्याचबरोबर तालुक्यातील नागरिकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा केली. यामध्ये मौजे देवंग्रा व देवंग्रावाडी येथे सिंगल फेज वीज देण्यात यावी. चाकूर शहरात येणाऱ्या काळात सिंगल फेज ऐवजी 100 के.व्ही. ट्रान्सफॉर्मर बसविण्याच्या सूचना केल्या. तालुक्यात 42 ट्रान्सफॉर्मर पैकी 36 ट्रान्सफॉर्मर दिले आहेत बाकी राहिलेले 6 या आठवड्यात देण्यात येणार आहेत.
तसेच तिवघाळ या गावांच्या विजेचा प्रश्न सोडविल्या बद्दल गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तहसीलदार शिवानंद बिडवे, तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे, काँग्रेस तालुकाध्यक्ष विलासराव पाटील चाकूरकर, माजी सभापती करीमसाहेब गुळवे, बालाजीदादा सूर्यवंशी, राधाकिशन तेलंग आदी उपस्थित होते.