निस्वार्थ राष्ट्रभक्तीचा आदर्श पंडित दीनदयाळ उपाध्याय – डॉ. गौरव जेवळीकर

निस्वार्थ राष्ट्रभक्तीचा आदर्श पंडित दीनदयाळ उपाध्याय - डॉ. गौरव जेवळीकर

उदगीर ( प्रतिनिधी ) : आज ज्या स्वातंत्र्याचा आपण सर्वजण उपभोग घेतो आहोत त्यापाठीमागे अनेकांनी वेगवेगळ्या मार्गांनी दिलेला स्वातंत्र्यलढा व स्वातंत्र्योत्तर काळात दिलेले योगदान त्याला कारणीभूत आहे. यामध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचेही नाव आदराने घ्यावे लागेल. मर्यादित गरजा असाव्यात ही त्यांची भूमिका होती. सुखसाधनांच्या हव्यासाकडे दुर्लक्ष करुन राष्ट्रासाठी समर्पित सेवेची शपथ त्यांनी घेतली होती. आर्थिक विकासाचे मुख्य उद्दिष्ट सामान्य माणसाचे सुख आहे, असे त्यांचे मत होते. पंडित दीनदयाळ उपाध्याय पोषणावर भर देणारी व्यवस्था निर्माण करू पाहत होते, शोषणावर नाही. निस्वार्थ राष्ट्रभक्तीचा आदर्श म्हणजे पंडित दीनदयाळ उपाध्याय होय, असे मत प्रा. डॉ. गौरव जेवळीकर यांनी व्यक्त केले. ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात दिनविशेष समितीच्यावतीने आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आर. के. मस्के हे होते. यावेळी व्यासपीठावर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. आर. एन. जाधव, पर्यवेक्षक प्रा. सी. एम. भद्रे, दिनविशेष समिती प्रमुख प्रा. डॉ. दीपक चिद्दरवार यांची उपस्थिती होती. 

                    पुढे बोलताना डॉ. जेवळीकर म्हणाले, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी माणसाच्या भौतिक प्रगतीबरोबरच अध्यात्मिक प्रगती झाली पाहिजे यावर भर दिला. विकासाचे धोरण समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे याबाबत ते आग्रही होते. वर्तमान परिस्थितीत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांचा अभ्यास करणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप करताना प्रभारी प्राचार्य डॉ.राजकुमार मस्के म्हणाले, पंडित दीनदयाळ उपाध्याय हे शिक्षणाला दीक्षा मानत असत. ‘एक चारित्र्यसंपन्न राजकारणी कसा असावा’, याचे उत्तम उदाहरण म्हणजे पंडित दीनदयाळ उपाध्याय होय. त्यांचे मानवतावादी विचार अनुकरणीय असून तरुणाईला प्रेरणा देणारे आहेत. त्यामुळे सर्वांनी अशा राष्ट्रभक्तांचे चरित्र वाचले पाहिजे, असे आवाहन उपस्थितांना केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. डॉ. दीपक चिद्दरवार यांनी तर आभार प्रा. डॉ. बळीराम भुक्‍तरे यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

About The Author