पत्रकारिता हा समाजसेवेचा उचललेला वसा होय – ना. संजय बनसोडे

पत्रकारिता हा समाजसेवेचा उचललेला वसा होय - ना. संजय बनसोडे

उदगीर (एल.पी.उगीले) पत्रकारिता हा अत्यंत कष्टाचा आणि केवळ समाजाचे हित आणि लोक जागृतीचा वसा घेऊन चालणारा समाज सेवेचा भाग आहे. त्यामुळे त्याला व्यवसाय हा शब्द जोडला जाऊ शकत नाही त्यात समाजाची सेवा आणि विकासाशी बांधील राहून समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून कार्य करणाऱ्या महत्त्वाच्या घटकांचा भाग आहे. असे उद्गार राज्यमंत्री ना संजय बनसोडे यांनी काढले. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने मराठवाडा विभागीय स्तरावरील पत्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि ज्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी आयोजित केलेल्या विभागीय स्तरावरील पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात अध्यक्षपदावरून ते बोलत होते.

 या कार्यक्रमासाठी यांना जीवनगौरव पुरस्कार दिला गेला ते प्रा. सुरेश पुरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, उदगीर उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे हे मान्यवर उपस्थित होते.

 कार्यक्रमाची सुरुवात उदगीर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष रामभाऊ मोतीपवळे यांच्या प्रास्ताविकाने झाली. याप्रसंगी कोरोना काळात उत्कृष्ट कार्य केलेल्या विविध विभागातील प्रमुखांचा कोरोना योद्धा म्हणून पत्रकार संघाच्या वतीने सत्कारही करण्यात आला. याप्रसंगी जीवनगौरव पुरस्कार विजेते प्रा. सुरेश पुरी, बसवराज पाटील नागराळकर, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी मनोगत व्यक्त केले.

 पुढे बोलताना संजय बनसोडे म्हणाले की, उदगीरच्या विकासाचा सर्व बॅकलॉग भरून काढण्यासाठी सर्व पत्रकार माझ्या पाठीशी असून विकास कामाच्या संदर्भात मला वेळोवेळी सूचना देतात, मार्गदर्शन करतात. त्यामुळे मला विकास कामाला गती देता आली. भविष्यकाळात उदगीरच्या विकासासाठी कोट्यावधीचा निधी येऊ शकेल, याबद्दल आश्वस्त  रहा. उदगीर तालुका पत्रकार संघाच्या मागणी विचारात घेऊन पत्रकार भवनासाठी निधी कमी पडू देणार नाही. तसेच लवकरात लवकर उदगीरच्या बसस्थानकाचा ही प्रश्न निकाली निघेल, असे आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिले. उदगीर येथे प्रसिद्धी कार्यालयाचे उपविभागीय कार्यालय व्हावेत, त्या दृष्टीने आपण प्रयत्न करू. असेही आश्वासन संजय बनसोडे यांनी दिले. पत्रकार संघाने अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित करून अत्यंत कर्तबगार माणसाला जीवनगौरव पुरस्कार दिला आहे, त्याबद्दल त्यांनी पत्रकार संघाचे आभारी व्यक्त केले. भविष्यकाळात विकासाच्या संदर्भात दिलेल्या प्रत्येक सूचनांचा आपण विचार करून त्याप्रमाणे कार्य करण्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रसूल पठाण यांनी तर आभार प्रदर्शन दयानंद बिरादार यांनी केले.

 याप्रसंगी मराठवाड्यातील उत्कृष्ट वार्ता गटातून प्रथम पारितोषिक दैनिक सकाळचे अविनाश काळे यांना तर द्वितीय पारितोषिक दैनिक पुण्यनगरी चे विनोद गुरमे आणि तृतीय पारितोषक दैनिक आदर्श गावकरी चे ज्योतीराम पांढरपट्टे यांना देण्यात आला.

 शोध वार्ता गटातून प्रथम पारितोषक दैनिक पुढारीचे शंकर बिराजदार यांना तर द्वितीय पारितोषक दैनिक पुण्यनगरीचे हनुमंत केंद्रे आणि तृतीय पारितोषक समय सारथी चे बापू नाईकवाडे यांना देण्यात आले. पारितोषिकाचे स्वरूप प्रथम पारितोषिक पाच हजार रुपये, द्वितीय पारितोषिक तीन हजार रुपये, तृतीय पारितोषिक दोन हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ असे होते.

 या देखण्या कार्यक्रमासाठी मराठवाड्यातील कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात पत्रकार उपस्थित होते.

About The Author