लातूरच्या स्वप्नाली गायकवाडचा गानसम्राज्ञी लता दिदींना वाढदिवसानिमित्त अनोखा नजराणा – सलग ९२ गाणी गाऊन केला विश्वविक्रम

लातूरच्या स्वप्नाली गायकवाडचा गानसम्राज्ञी लता दिदींना वाढदिवसानिमित्त अनोखा नजराणा – सलग ९२ गाणी गाऊन केला विश्वविक्रम

लातूर : कलेच्या सेवे सारखी दुसरी सेवा नाही आणि संगीत साधने सारखी दुसरी साधना नाही. अशाच या संगीत क्षेत्रातील साक्षात सरस्वती म्हणजेच भारतरत्न पुरस्कृत ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त लातूरची गायिका स्वप्नाली गायकवाडने या गानसम्राज्ञीला एक अनोखा नजराणा दिला आहे. स्वप्नाली गायकवाड संगीताची निस्सिम साधक आहे आणि दिदी तिच्यासाठी आदर्श आहेत. याच साधनेच्या आधारे तिने लता दिदींना भेट दिली आहे. स्वप्नालीने लता दिदींच्या ९२व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आजवर गायलेली ९२ गाणी अवघ्या ४ तासात सलग गाऊन अजाणतेपणी विश्वविक्रम केला आहे. या विक्रमाची नोंद हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झाली आहे. या ९२ गाण्यांमध्ये लग जा गले, होठों पे ऐसी बात, जाने क्या बात है या आणि अशा अनेक अजरामर गीतांचा समावेश आहे. यासाठी स्वप्नाली गेल्या ३ महिन्यांपासून अथक सराव करत होती आणि तिच्या या अथक प्रयत्नांमधून तिने हे आगळे-वेगळे स्वप्न साकार केले आहे.

स्वप्नाली गायकवाड ही मूळची लातूरची असून ती ४ वर्षांपासून संगीत क्षेत्रात कार्यरत आहे. ती पं. उपेंद्र भट्ट (पं. भिमसेन जोशींचे परम शिष्य) यांची शिष्य आहे याचसोबत तिने पुण्याच्या एम आय टी विश्वशांती संगीत कला अकादमी मधून देखील संगीताचे शिक्षण घेतले आहे. ती कायमच भारतरत्न लता मंगेशकर यांच्या कलेने प्रभावित होती आणि त्यांचे भाचे आदिनाथ मंगेशकर यांच्याकडून संगीताचे धडे गिरवताना स्वप्नालीला हे सारं अधिकच जवळून अनुभवण्याची संधी मिळाली. स्वप्नालीची ही भेट आदिनाथ मंगेशकरांसाठी आश्चर्याचा एक सुखद धक्काच होती आणि त्यांनी त्यासाठी तिचे खूप कौतुकही केले.

मराठवाड्याची ही गायिका म्हणजेच स्वप्नाली ऑनलाईन माध्यमातून जगभरातील अनेकविध विद्यार्थ्यांना भारतीय शास्त्रीय संगीत शिकवत आहे. स्वप्नालीच्या मते हा विश्वविक्रम तिच्या या सगळ्या विद्यार्थ्यांच्या योगदानाशिवाय पूर्ण होऊ शकला नसता. या विषयी ती सांगते – “माझ्या विद्यार्थ्यांनी गाण्यांची निवड करणे, म्युझिकल व्हिडिओसाठी गाण्यांची अरेंजमेंट करणे या सगळ्यासाठी खूप मदत केली.” या नजराण्यात कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये म्हणून तिने अथक सराव व प्रयत्न केले. रोजच्या रियाजासोबतच तिने पूर्ण सेटपसह देखील रियाज केला.

स्वप्नाली गायकवाडच्या या अथक प्रयत्नांना, तिला सहाय्य करणाऱ्या सगळ्यांच्या प्रयत्नांना या विश्वविक्रमासोबत यश आलं आहे. आपल्या आदर्शस्थानी असलेल्या गानसम्राज्ञीला स्वप्नालीने दिलेल्या या विलक्षण नजराण्याने अनेकांचे लक्ष वेधले व स्वप्नालीला अनेकांकडून कौतुकाची थाप मिळाली.

About The Author