लातूर तालुका सहकारी सोसायटी चेअरमन यांच्या वतीने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा सत्कार
लातूर बँकेने शेतकऱ्यांना पाच लाख रुपयांपर्यंत शून्य दराने पिक कर्ज देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल केले आभार व्यक्त
लातूर (प्रतिनिधी) : राज्यात नव्हे तर देशात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकात पहिल्या स्थानावर झेप घेतलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने लातूर जिल्ह्यातील शेतकरी सभासद याना पाच लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी पिक कर्ज देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेवून शेतकरी सभासदांना मोठ्या प्रमाणावर न्याय देण्याचे काम केले आहे त्याबद्दल लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मार्गदर्शक राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांचा लातूर तालुका विविध कार्यकारी सेवा सोसायटी चे चेअरमन यांच्यावतीने शुक्रवारी आशियाना निवासस्थानी सत्कार करण्यात आला यावेळी लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख, बँकेचे चेअरमन अँड श्रीपतराव काकडे, माजी आमदार वैजनाथ जी शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक नाथसिंह देशमुख , जिल्हा परिषद सदस्य धनंजय देशमुख, माजी बाजार समितीचे सभापती वाल्मीक माडे तसेच लातूर तालुक्यातील नांदगाव सोसायटी चे चेअरमन सतिश कुलकर्णी, महापूर चे दिलीप माने, बोरवटी चे रावसाहेब लकडे व बहुतांश सोसायटीचे चेअरमन, गट सचिव प्रामुख्याने उपस्थित होते.
पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यासाठी लवकरच धोरण ठरेल
यावेळी बोलताना दिलीपराव देशमुख म्हणाले की पाच लाख रुपयांपर्यंत शून्य दराने कर्ज वाटपाचे धोरण निश्चित करण्यासाठी पाच सदस्यांची कमिटी नेमली असून या समितीचा अहवाल बोर्डा समोर आल्यानंतर तातडीने वाटप प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी दिली.