लातूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा – शेतकरी संघटना
जिरायतसाठी एकरी ५०००० रु. व बागायतीसाठी एकरी १००००० रु. सरसकट मदत द्या
लातूर (प्रतिनिधी) : गेल्या आठवड्यात सबंध मराठवाड्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या समोर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे.कारण या वर्षी खरीप पेरणीच्या वेळी सोयाबीनचे भाव १०-१२ हजारांच्या वर होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीकरीता मोठ्या प्रमाणावर खर्च केला. खुरपणी, फवारणी वेळच्या वेळी व महागडी औषधे वापरली. त्यात अचानक पावसाने खंड घेतला. ज्यामुळे ऐन फुलांचा बहार असताना पाणी न मिळाल्याने फुलगळ झाली.त्यातून कशी बशी पिके सावरुन आता काही का असेना पदरात पडेल या भाबड्या आशेवर शेतकरी असताना, अतिवृष्टी झाली आणि हातातोंडाशी आलेल्या उभ्या सोयाबीनच्या शेंगातच दाणे अंकुर फोडू लागले. तर नदी,नाले,ओढ्या लगतच्या जमीनीतील सोयाबीन पिके वाहून गेली, काही पाण्यात राहील्याने कुजून गेली. ऊसाचे फडच्या फड आडवे पडले आहेत.
म्हणून अशा कठीण परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहुन त्यांना धीर देणे आवश्यक आहे.त्याकरीता लातूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करुन राष्ट्रीय आपत्ती निवारण कायद्यानुसार शेतकऱ्यांनी केलेला हजारो रुपयांचा उत्पादन खर्च भरुन निघेल जो बहुतांश शेतकऱ्यांनी कर्ज काढून केलेला असतो तो भरुन निघेल व त्यांच्या इतर मुलभूत गरजा भागवता येतील एवढी तरी नुकसान भरपाई जिरायतसाठी एकरी ५०००० रु. व बागायतीसाठी एकरी १००००० रु.सरसकट मदत द्यावी. पुरात सापडलेल्या उसाचे साखर कारखान्यांनी प्रोग्राम ची अट न चालता प्राधान्याने गाळप करावे.अनेक ठिकाणी पूरामुळे रस्ते बंद झाल्यामुळे विमा कंपन्यानी ७२ तासात नुकसानीची सुचना देण्याची घातलेली मुदत आणखी ७२ तास वाढवून द्यावी. पुरात वाहून गेलेल्या व्यक्ती, जनावरे, गोठे, आदिंचे पंचनामे करून भरघोस मदत द्यावी. आदी मागण्यांचे निवेदन लातूरचे जिल्हाधिकारी यांना शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आले.यावेळी जेष्ठ नेते अशोकराव पाटील, युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके, कार्याध्यक्ष बालाजी जाधव, उदगीर तालुकाध्यक्ष कालीदास भंडे, करण भोसले, राम शंके आदींची उपस्थिती होती.