जागतिक जेष्ठ नागरिक दिन व थोडेसे माय बापासाठी पण उपक्रमाअंतर्गत नगर परिषद उदगीर मार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन
उदगीर ( एल.पी. उगीले ) : “थोडेसे माय बापासाठी पण” या उपक्रमांतर्गत नगर परिषद उदगीर मार्फत शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमांची सुरुवात सकाळी 6 वाजता “जेष्ठ नागरिकांकरिता योग शिबिर” यापासून झाली. शहरातील बहुप्रचलित अटल योग केंद्र येथे नगर परिषद उदगीर मुख्याधिकारी श्री. भारत राठोड यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती श्री. रमेश अंबरखाने, प्रा.स्वामी, श्री. साईनाथ चिमेगावे आदींची लाभली. योग शिबिरासाठी शहरातील बहुसंख्य जेष्ठ नागरिकांनी उपस्थिती लावली होती.
यानंतर 9 वाजता जेष्ठ नागरिकांसाठी समाज मंदिर, अशोक नगर येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष स्थानी नगर परिषद सदस्य श्री. विजय निटूरे उपस्थित होते तसेच आरोग्य तपासणी करिता डॉ. अक्षय मद्रे व एनयुएचएम संघ उपस्थित होता. या कार्यक्रमाकरिता परिसरातील जेष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
हुतात्मा गार्डन येथे नगर परिषद उदगीरचे सेवा निवृत्त जेष्ठ कर्मचाऱ्यांचा गौरव समारंभ श्री. भारत राठोड यांच्या कल्पनेतून आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमा मध्ये “आझादी का अमृत महोत्सव” या मोहिमेअंतर्गत स्वच्छता क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नागरिकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी अध्यक्ष स्थानी न.प. अध्यक्ष श्री. बस्वराज बागबंदे, उपाध्यक्ष श्री. सुधीर भोसले, सदस्य श्री. गणेश गायकवाड, अमोल अनकल्ले आदी उपस्थित होते. प्रमुख उपस्थितांच्या हस्ते न.प. च्या सेवा निवृत्त कर्मचाऱ्याचा यथोचित सन्मान करण्यात आला. स्वच्छ भारत अभियान 2022 अंतर्गत या वर्षी स्वच्छता ब्रँड ऍम्बेसिडर म्हणून श्री. रमेश अंबरखाने यांची नियुक्ती करण्यात आली, तसेच स्वच्छ व्यावसायिक म्हणून श्री.प्रदीप बेद्रे, स्वच्छ महिला बचत गट विकास वस्तीस्तर संघ, स्वच्छ एन जी ओ म्हणून सलात अल्पसंख्याक बहुद्देशीय सेवाभावी संस्था व कारवां फाउंडेशन यांचा सन्मान करण्यात आला.
दुपारच्या सत्रात गांधी गार्डन येथे जेष्ठ नागरिकांकरिता विरंगुळा केंद्राचे उद्घाटन न.प. सदस्य श्री. मनोज पुदाले यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच बेघर निवारा केंद्र याठिकाणी शहरातील तिसऱ्या जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे उदघाटन उदगीर शहराचे नायब तहसीलदार श्री. धाराशिवकर यांचा मार्फत करण्यात आले. याचवेळी न.प. चे मुख्याधिकारी श्री. भारत राठोड यांचा संकल्पनेतून व सलात अल्पसंख्याक बहुद्देशीय संस्थेच्या प्रयत्नेतून ” टाकाऊ वस्तूंपासून सुशोभीकरणाच्या वस्तूंचे” प्रदर्शन स्वच्छ भारत अभियान अंतर्गत राबविण्यात आले. यावेळी असद जमाल सिद्दीकी, खुर्शीद आलम, शेख गौस खुर्शीद अहमद, शेख समीर आदी उपस्थित होते.
याशिवाय शहरभर घरोघरी जाऊन स्वच्छता निरीक्षकांमार्फत जेष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ, कोरोना प्रतिबंधक लसीकरण इ. भरगच्च कार्यक्रम राबविण्यात आले.
यामुळे शहरातील जेष्ठ नागरिकांमध्ये एक प्रकारे उत्साहाचे वातावरण दिसून आले.