महापुरुष समर्पित जीवनाची प्रेरणा – बसवराज पाटील नागराळकर

महापुरुष समर्पित जीवनाची प्रेरणा - बसवराज पाटील नागराळकर

उदगीर : ( दिनांक 2 ऑक्टोंबर 2021) महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्यासारखे महापुरुष समाजाला, राष्ट्राला दिशा देण्याचे काम करत असतात. त्यांनी केलेला त्याग व समर्पण हे आजही प्रेरणा देणारे आहे, असे मत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांनी व्यक्त केले. ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात दिनविशेष समिती व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती कार्यक्रमात अध्यक्षीय समारोप करताना बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्था उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, सचिव प्रा. मनोहरराव पटवारी, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ. आर. के. मस्के (व. म. ), प्रा. आर. एन. जाधव ( क. म. ), प्रा. सी. एम. भद्रे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना नागराळकर म्हणाले, लालबहादूर शास्त्री देशासाठी जगणारे शांत, संयमी पंतप्रधान म्हणून आजही त्यांची ओळख आहे. त्यांनी केलेले संस्कार त्यांची पुढील पिढी चालवत आहे, याचा मी साक्षीदार आहे. महापुरुषांचा विचार डोळ्यासमोर ठेवून उदयगिरीने वाटचाल करावी, अशी भावना व्यक्त केली. संस्था सचिव पटवारी म्हणाले, महापुरुषांचे निस्वार्थी जीवन व राष्ट्राप्रती असलेली त्यांची बांधिलकी पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. शिक्षकच समाजाला दिशा देऊ शकतात आणि महापुरुषांना विचार व कृतीने जिवंत ठेवू शकतात, असे विचार मांडले. संस्था उपाध्यक्ष तिरुके म्हणाले, राजकारण हे समाजसेवेचे माध्यम आहे. याचा आदर्श वस्तुपाठ महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांनी घालून दिला. तोच वारसा पुढे चालविण्याचे कार्य आम्ही करत आहोत, असे मत व्यक्त केले. यावेळी डॉ. दीपक चिद्दरवार व डॉ. गौरव जेवळीकर यांचीही महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकणारी भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी यांनी केले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या माध्यमातून ‘महाविद्यालय परिसर स्वच्छता अभियान’ राबविण्यात आले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी श्रमदान केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रवीण जाहूरे यांनी तर आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. बालाजी होकरणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ‘रासेयो’ कार्यक्रम अधिकारी डॉ. बंकट कांबळे, डॉ. सुनंदा भद्रेशेट्टे, राष्ट्रीय छात्र सेना डॉ. राम साबदे यांनी पुढाकार घेतला.

About The Author