लिंगायत धर्माच्या संविधानिक मान्यता आणि अल्पसंख्यांक दर्जाच्या मागणीसाठी राज्यव्यापी महामोर्चाचे आयोजन

लिंगायत धर्माच्या संविधानिक मान्यता आणि अल्पसंख्यांक दर्जाच्या मागणीसाठी राज्यव्यापी महामोर्चाचे आयोजन

लातूर (प्रतिनिधी) : लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता तसेच राज्यस्तरावर अल्पसंख्यांक दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी रविवार, दि. २४ ऑक्टोबर २०२१ रोजी परभणी येथे राज्यव्यापी लिंगायत महामोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीचे अध्यक्ष अविनाश भोसीकर, प्रांताध्यक्ष माधवराव पाटील टाकळीकर यांनी लातुरात पत्रकारांशी बोलतांना दिली. लिंगायत धर्माला स्वतंत्र, स्वाभिमानी व मानवतावादी इतिहास आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सात दशके उलटूनही लिंगायत समाज बांधव आपल्या संविधानिक हक्क – अधिकारांपासून वंचित आहेत. त्यामुळे समाजाला आज शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक अशा अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सर्वांना आर्थिक निकषावर आरक्षण दिले गेले पाहिजे. समाजातील समस्यांची न्याय मार्गाने सोडवणूक करण्याच्या मागणीसाठी सदर महामोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे भोसीकर, टाकळीकर यांनी सांगितले. लिंगायत धर्मातील एकूण ३५० जाती – पोटजातींमधील समाज बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी सदर महामोर्चाचा मार्ग अवलंबला जाणार आहे. या महामोर्चाच्या माध्यमातून राज्य सरकारकडे लिंगायत धर्माच्या संविधानिक मान्यतेसाठी केंद्राकडे शिफारस करावी, राज्यातील लिंगायत धर्मियांना धार्मिक अल्पसंख्यांक दर्जा जाहीर करावा,लिंगायत बेरोजगार युवकांच्या उन्नतीसाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, मंगळवेढा येथील मंजूर असलेल्या महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकाचे काम त्वरित सुरु करावे, राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी,परभणी शहरात महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात यावा आदी मागण्यांसाठी हा महामोर्चा काढण्यात येणार आहे, असे भोसीकर आणि टाकळीकर यांनी सांगितले.

लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता होती. पण ती १९५१ मध्ये रद्द केली गेली आहे. तेव्हापासून लिंगायत धर्मीय समाज बांधव धार्मिक अल्पसंख्यांकांच्या सर्व सोयी, सवलती, हक्कांपासून वंचित झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत झाले ते झाले पण, किमान पुढील पिढीच्या उज्वल भवितव्यासाठी समाजाने संघटित होऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी अशा प्रकारचे महामोर्चे ,आंदोलने करून समाजाला न्याय मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत. हा महामोर्चा दि. २४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता शनिवार बाजारपासून निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे. या महामोर्चात लिंगायत धर्मियांनी लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे व आपली एकजूट शासन – प्रशासनाला दाखवून द्यावी,असे आवाहनही अविनाश भोसीकर, माधवराव पाटील टाकळीकर यांनी केले आहे. यावेळी प्रा. राजेश विभुते, प्रा. सुनील हेंगणे, बसवराज हेंगणे, शिवलिंग जेवळे, इरण्णा पावले, पुष्कराज खुब्बा आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

About The Author