72 तासात शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य द्या अन्यथा तीव्र आंदोलन – बाळासाहेब पाटोदे

72 तासात शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य द्या अन्यथा तीव्र आंदोलन - बाळासाहेब पाटोदे

 उदगीर (प्रतिनिधी) : अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे. गावातील शेतीसुद्धा खरवडून गेली आहे. त्यामुळे पिकासोबत शेतीचे मोठे नुकसान झाले आहे, आणि हे नुकसान न भरून येणारे असल्याने शेतकऱ्यांना तात्काळ अर्थसाह्य करावे. अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल. असा इशारा भारतीय जनता पार्टीचे युवानेते तथा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष बाळासाहेब पाटोदे यांनी दिला आहे. महसूल प्रशासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्याला रीतसर भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवेदन दिले असून शासनाने या निवेदनाचा गांभीर्याने विचार करावा आणि शेतकऱ्यांना अर्थसाह्य करावे. शेतकऱ्यांना पीक विम्याच्या संदर्भात मदत तर करावीच करावी, त्याशिवाय शासनाने हेक्‍टरी 50 हजार रुपये अर्थसाह्य द्यावे. अशी ही आग्रही मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.

 उदगीर परिसरातील शेतकऱ्यांची तर फार मोठी गोची झाली आहे. सुरुवातीला पावसाने दिलेली ताडन त्यामुळे सोयाबीन, उडीद, मूग पिके वाळून जात होती. त्यात पुन्हा झालेली अतिवृष्टी त्यामुळे हातातोंडाशी आलेले पिक गेले आहे. कित्येक ठिकाणी सोयाबीन पीक काढणे सुद्धा शेतकऱ्याला न परवडणारे झाल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्याला धीर देऊन पुन्हा उभारी घेण्याची शक्ती यावी. या दृष्टीने शासनाने मदत करणे गरजेचे आहे. नैतिक जबाबदारी समजून शासनाने 72 तासाच्या आत आर्थिक मदत द्यावी. जेणे करून शेतकऱ्याचे सण साजरे होतील. कित्तेक शेतकऱ्यांनी या पिकाच्या आधारावर आपल्या घरच्या लग्न कार्याचे स्वप्न पाहिले होते, कित्तेक शेतकऱ्यांना या पिकाच्या आधारावर आपण कर्ज फेडू अशी आशा वाटत होती. मात्र निसर्गाने घाला घालून शेतकऱ्याला अडचणीत आणले आहे. अशा परिस्थितीत मायबाप सरकारने पालकत्वाची भूमिका घेऊन शेतकऱ्याला जगवणे गरजेचे आहे. असे विचार बाळासाहेब पाटोदे यांनी व्यक्त केले आहेत. शासनाने शेतकऱ्यांना मदत करण्यात हलगर्जीपणा केल्यास भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल. असेही त्यांनी सांगितले.

About The Author