दांडिया चा परवाना नाकारला, हा तर संस्कृतीवर घाला !! – पाटोदे
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर येथे गेल्या कित्येक वर्षापासून भारतीय संस्कृतीचे प्रतीक म्हणून नवदुर्गा च्या काळात राधा साई दांडिया महोत्सव घेतला जातो. या महोत्सवाच्या दरम्यान शालेय विद्यार्थिनी, महाविद्यालयीन विद्यार्थिनी, शाळाबाह्य मुली, महिला त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जात होते. या वर्षी ही त्याच अनुषंगाने पूर्ण नियोजन केले होते.
संयोजक मंडळी, स्पर्धक आणि भाविक भक्त चांगले तयारीला लागले होते. मात्र पोलिस प्रशासनाच्या वतीने दांडिया महोत्सवाला परवानगी नाकारली आहे. यामुळे उदगीरकर अत्यंत नाराज झाले आहेत.
यासंदर्भात बोलताना संयोजक बाळासाहेब पाटोदे यांनी नाराजी व्यक्त करत हा भारतीय संस्कृतीवर घाला आहे.असे सांगीतले. जर बंद करायचेच असेल तर सर्वांना समान न्याय हवा! सत्तेतील मंडळी, मंत्री यांच्या मोठमोठ्या सभा, मिरवणुका तसेच काँग्रेसच्या आमदारांच्या कार्यकर्त्यांच्या सुसंवाद मेळाव्यास किंवा जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने घेतल्या जाणाऱ्या बैठकांना खुलेआम परवानगी दिली जाते! इतकेच नाही तर पोलीस प्रशासन त्यांच्या दिमतीला, बंदोबस्तासाठी हजर असते. हे अत्यंत चुकीचे आहे. सर्वांना समान न्याय या सामाजिक तत्वाचा हा अपमान आहे. कारण दांडिया महोत्सवात आणि स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिलांचा सहभाग या सभा, संमेलने, मेळावे, मिरवणुका यांच्या तुलनेत नगण्य असतो. असे असताना देखील केवळ भारतीय संस्कृतीवर घाला घालण्याच्या उद्देशाने राधा साई दांडिया महोत्सवाला परवानगी नाकारली असावी. अशी तीव्र नाराजी भारतीय जनता पार्टीचे युवानेते, युवा मोर्चाचे उदगीर अध्यक्ष बाळासाहेब पाटोदे यांनी व्यक्त केली आहे. सत्ताधारी पक्षाचा कितीही मोठा कार्यक्रम होत असला तरी त्याला परवानगी देणे हे कातपत योग्य आहे? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला आहे.