शेतकर्‍याला न्याय द्या;अन्यथा योग्यवेळी धडा शिकवू – माजी पालकमंत्री निलंगेकर

शेतकर्‍याला न्याय द्या;अन्यथा योग्यवेळी धडा शिकवू - माजी पालकमंत्री निलंगेकर

लातूर (प्रतिनिधी) : परराज्यात झालेल्या अन्यायाबाबत राज्यातील सरकारने बंद पुकारला आहे. या बंदसाठी सत्ताधारी रस्त्यावर उतरत आहेत. परंतु आपल्या राज्यातील शेतकर्‍यांचे अतिवृष्टी व पुरपरिस्थीतीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. हे वास्तव असतानाही राज्यातील शासनाने शेतकर्‍यांना मदत जाहीर न करता वार्‍यावर सोडलेले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकर्‍यांना न्याय मिळावा या भूमिकेतून शेतकर्‍यांच्या हितासाठी आम्ही भाजपाच्या माध्यमातून अन्‍नत्याग आंदोलन सुरू केलेले आहे. यानंतरही राज्य शासनाने मदत नाही जाहीर केली तर या शासनाला योग्यवेळी धडा शिकवू, असा इशारा माजी पालकमंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी यावेळी दिला आहे.

यावेळी ते शहरातील मध्यवर्ती असणार्‍या छत्रपती शिवाजी चौकामध्ये शेतकर्‍यांच्या हितासाठी आयोजित अन्‍नत्याग आंदोलनात बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड, माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, संघटन सरचिटणीस संजय दोरवे, शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, प्रदेश महिला आघाडीच्या उपाध्यक्षा स्वाती जाधव, प्रदेश प्रवक्त्या प्रेरणा होनराव, प्रदेश कार्यकारणी सदस्य शैलेश लाहोटी, जि.प.च्या उपाध्यक्षा भारतबाई सोळूंके, शहर महिला अध्यक्षा मिना भोसले, मनपा गटनेते शैलेश गोजमगुंडे, किसान मोर्चा अध्यक्ष साहेबराव मुळे, भाजपा युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष नीळकंठराव पवार, बाबासाहेब कोरे, सुर्यकांतराव शेळके, राजेभाऊ मुळे, प्रताप शिंदे, बन्सी भिसे, अनिल भिसे, दशरथ सरवदे, डॉ. बाबासाहेब घुले, सतिष आंबेकर,गोविंद नरहरे, विक्रम शिंदे, हनमत बापू नागटिळक, अशोक केंद्रे यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तत्पुर्वी या आंदोलनास माजी आ.विनायकराव पाटील, भागवत सोट, रामचंद्र तिरुके, जि.प. कृषी सभापती गोविंद चिलकुरे आदींनी आंदोलनात सहभागी होऊन मार्गदर्शन केले. आंदोलनाच्या प्रारंभी आ.संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाध्यक्ष आ.रमेश कराड, माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी गोलाई येथील जंगदंबा देवीची महाआरती करून आशीर्वाद घेतला. त्यानंतर शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
127 शेतकरी, 32 गावे अन् विविध संघटनांचा पाठिंबा
शेतकर्‍यांच्या हितासाठी भाजपाच्या पुढाकरातून होत असलेल्या अन्‍नत्याग आंदोलनाला लातूर जिल्ह्यातील 127 शेतकर्‍यांनी 72 तास अन्‍नत्याग करण्याचा निर्धार करीत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. तसेच 32 गावांनी आपापल्या घरातील चुल बंद करून आंदोलनास सक्रिय पाठिंबा दर्शविलेला आहे. तर रयत प्रतिष्ठाण दिव्यांग आघाडी, अखिल भारतीय छावा व राष्ट्रीय समाज पक्ष अशा विविध संघटनांनी या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला.
शेतकरी हिताचे हे सरकार नसून शेतकरी लुटीचे सरकार आहे – माजी आ.कव्हेकर
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरीहितासाठी पिक विमापध्दत लागू केली. यामध्ये अतिवृष्टी, बनीम वाहने, जमीन घासून जाणे असे प्रकार अतिवृष्टीमुळे घडले तेव्हा त्या-त्या शेतकर्‍याला सर्वाधिक मदत मिळवून देण्याचे काम केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली तत्कालिन सरकारने केले. परंतु 2020 मध्ये राज्यातील सत्तांतरानंतर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. यामध्ये बीड,लातूर, नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परंतु मदत मात्र मिळाली नाही. पिकविम्यापोटी 17 लाख 91 हजार 522 शेतकर्‍यांनी 804 कोटी रूपये भरले. परंतु त्या विम्यापोटी 13.46 कोटीची मदत राज्याला मिळाली. केवळ 1.69 टक्के मदत राज्याला आली. या मदतीच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सध्याचे हे विद्यमान सरकार शेतकरी हिताचे नसून शेतकरी लूटीचे सरकार आहे हे सिध्द झालेले आहे. आताही नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत पाणी सोडण्याची सुचना सारसा, काळे बोरगाव या गावातील शेतकर्‍यांना दिली नसल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झालेले आहे. या नुकसानीचे सरसगट पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी अन्यथा परिणामाला सामोरे जावे लागेल, असा इशारा भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी अन्‍नत्याग आंदोलनादरम्यान केले.

About The Author