स्वच्छता महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार

स्वच्छता महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार

लातूर (प्रतिनिधी) : येथील दयानंद कला महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागातर्फे दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवाजी गायकवाड यांच्या हस्ते स्वच्छता करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा गुलाब पुष्प आणि पेंड खजुराचे पाकीट देऊन सत्कार करण्यात आला.हा कार्यक्रम नवरात्र उत्सवानिमित्त घेण्यात आला. नवरात्रामध्ये स्त्रिया विशिष्ट रंगाच्या वेशभूषा करून फोटो काढतात तसेच कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करतात.या दोन्ही रूढीगत प्रथांना फाटा देऊन समाजशास्त्र विभागाने स्वच्छता कर्मचारी स्त्रियांच्या कामाचा सन्मान केला आहे.सामान्यपणे स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता आढळून येते ती भरून काढण्यासाठी या सर्व स्वच्छता करणाऱ्या महिलांना खजूर पाकिटाचे वाटप करण्यात आले. सदरील उपक्रमाचे दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, सचिव रमेश बियाणी तसेच दयानंद शिक्षण संस्थेचे सदस्य दिनानाथ भुतडा यांनी कौतुक केले.

समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर अंजली जोशी यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना ग्रंथालय परिचर असणाऱ्या निर्मला दहिरे यांनी त्यांच्या कामाचा सन्मान केल्याबद्दल प्राचार्य शिवाजी गायकवाड आणि डॉ.अंजली जोशी यांचे आभार मानले.नसीमा शेख यांनी अशा उपक्रमातून आम्हाला काम करण्याची अधिक प्रेरणा मिळते असे मत व्यक्त केले.महाविद्यालयात प्राध्यापक बसतात त्या खुर्च्यांवर आम्हाला बसवून आमचा सन्मान केला त्याचा मला विशेष आनंद असल्याचे संगीता कांबळे यांनी सांगितले.

या कार्यक्रमास दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवाजी गायकवाड, समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ.अंजली जोशी, प्रा.डॉ.भाऊसाहेब आदमाने, ग्रंथपाल डॉ. अपर्णा पसारकर उपस्थित होते. यावेळी संगीता कांबळे, जगदेवी कांबळे, रूपाली सूर्यवंशी, रेखा घोडके, ललिता वाघमारे, नसीमा शेख, अर्चना आदमाने, शालन कबीर, ललिता पोरे, दहिरे बाई यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे आभार ग्रंथपाल डॉ. अपर्णा पसारकर यांनी व्यक्त केले.

About The Author