एम आय एम चे पाच नगरसेवक राष्ट्रवादीत तर एक काँग्रेसच्या बाजूने!!
उदगीर (एल.पी. उगिले) : उदगीर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय हालचालींना गती आली आहे. यामध्ये प्राधान्याने काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यानंतर आणि पालक मंत्री अमित देशमुख यांनी राष्ट्रवादीचे नेते राज्यमंत्री ना. संजय बनसोडे यांना कोपरखळ्या मारून अवहेलना केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वाभिमान जागा झाला आहे, आणि अत्यंत त्वेषाने पक्षबांधणीला प्राधान्यक्रम दिला आहे. यामुळेच काँग्रेस, बीजेपी, एम आय एम पक्षातील आजी-माजी नगरसेवकांना प्रवेश देऊन वेगळी शक्ती निर्माण केली जात आहे.
एम आय एम ने 2016चा नगरपालिका निवडणुकांत पदार्पणातच दर्जेदार यश संपादन केले होते. तर सर्व जनतेतून निवडला जाणारा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारास निसटता पराभव पहावा लागला होता. आणि पाच नगरसेवक वेगवेगळ्या प्रभागातून निवडून आले होते, तर एक नगरसेवक श्री स्विकृत निवडला गेला होता.
मात्र यावर्षी होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एमआयएमच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला आहे तर एक नगरसेवक काँग्रेसच्या बाजूने आहे. गेल्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जबर फटका देणारा एम आय एम पक्ष आता काय करेल? याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.
गेल्या वेळेस 38 पैकी 14 जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या, तर नगराध्यक्षांसह 18 जागावर भाजपने वर्चस्व गाजवले होते. त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकात काय होईल? कोणाची बाजू प्रभावी ठरेल? याकडे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये यापूर्वीच माजी नगरसेवक अनिल मुदाळे, राजकुमार चव्हाण, अक्रम बेग तसेच सक्रिय कार्यकर्ते जानिमिंया, बबलू मुळे यांना प्रवेश दिला होता.
आता मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नबाब मलिक, राज्यमंत्री संजय बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत एम आय एम चे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक सय्यद ताहेर हुसेन, जरगर शमसुद्दीन, शेख नूरजहाँ बेगम, शेख फैय्याज, हाश्मी रेश्मा खतेजा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
चौकट
त्यांच्या जाण्याने एम आय एम स्वच्छ झाली
सहा नगरसेवकांनी एमआयएम सोडली असली तरी एम आय आम चे नुकसान झाले नाही. सर्वसामान्य मतदार आजही एमआयएम सोबत आहे. या नगरसेवकांनी एम आय एम पक्ष संघटना सोडून इतर पक्षात प्रवेश केला असला तरी जनता त्यांना कधीही माफ करणार नाही. नवीन चारित्र्यसंपन्न उमेदवार एम आय एम कडून दिले जातील, आणि ते विजयी होतील. असा आम्हाला विश्वास आहे.
पठाण सनाउल्ला खान
एमआयएमचे नेते, उदगीर
चौकट
मी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे
एम आय एम के जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक सय्यद ताहेर हुसेन यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा खासदार इम्तियाज जलील यांच्याकडे पाठवला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदचंद्रजी पवार, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राज्यमंत्री ना संजय बनसोडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मुंबई पक्ष प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.