भाजपाने सर्वसामान्यांच्या सुख दुःखात सहभागी व्हावे
लातूर जिल्हा भाजपा आढावा बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील
लातूर (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधी, पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सर्व सामान्यांच्या सुख दुःखात सतत सहभागी व्हावे हीच खरी भाजपाची बांधीलकी आहे असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी लातूर जिल्हा भाजपा आढावा बैठकीत बोलताना केले.
देगलूर विधानसभा निवडणुकीतील भाजपाचा उमेदवाराच्या प्रचारासाठी जात असताना सोमवारी सकाळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी सकाळी लातूर येथील शासकीय विश्रामगृहावर लातूर जिल्हा भाजपाची आढावा बैठक घेवून अनेक महत्वपुर्ण सुचना केल्या. प्रारंभी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी प्रदेशाध्यक्ष पाटील यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
यावेळी माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, खा. सुधाकर शृगारे, प्रदेश उपाध्यक्ष विनायकराव पाटील, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव, प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, राष्ट्रीय सदस्य शिवाजीराव पाटील कव्हेकर, प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, विभागीय संघटनमंत्री संजय कौडगे, माजी खासदार सुनिल गायकवाड, जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे, किरण उटगे, रामचंद्र तिरूके, शैलेश गोजमगुंडे, शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे, शहर सरचिटणीस मनिष बंडेवार, दिग्वीजय काथवटे, शिरीष कुलकर्णी, जिपचे सभापती रोहिदास वाघमारे, प्रदिप पाटील खंडापूरकर, बाजार समिती संचालक विक्रम शिंदे, गोविंद नरहरे, ओबीसी मार्चाचे जिल्हाध्यक्ष बापुराव राठोड, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर चेवले, अजित कव्हेकर, प्रेरणा होनराव, रेखाताई तरडे, मिनाताई सुर्यवंशी, स्वाती जाधव, प्रविण सावंत, यांच्यासह लातूर शहर आणि ग्रामीण जिल्हयातील मंडलाचे अध्यक्ष, भाजपाचे लोकप्रतिनिधी, पक्ष पदाधिकारी मोठया संख्येनी उपस्थित होते.
यावेळी प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी लातूर शहर आणि ग्रामीण जिल्हयातील भाजपाच्या संघटनात्मक कामाचा आढावा घेतला. भाजपाच्या लोकप्रतिनिधी, पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी घेतलेल्या महत्वपुर्ण निर्णयाची माहिती गरजू लाभार्थ्यापर्यंत पोंहचवावी आणि राज्यातील महाविकास आघाडीचे सर्वपातळीवर आलेले अपयश जनतेत जावून मांडावेत. त्याचबरोबर सर्वसामान्यांच्या सातत्याने सुख दुःखात सहभागी व्हावे यातून पक्षाची ध्येयधोरणे पोंहचविण्यास मदत होईल असे बोलून दाखविले.