कोजागिरी पौर्णिमा आरोग्याच्या दृष्टीने – डॉ.भाग्यश्री घाळे

कोजागिरी पौर्णिमा आरोग्याच्या दृष्टीने - डॉ.भाग्यश्री घाळे

आपण कोजागिरी पौर्णिमा साजरा‌ करतोय,यालाच शरद‌ पौर्णिमा,नवान्न‌ पौर्णिमा ही नावेही आहेत. आपली भारतीय संस्कृती इतकी संपन्न आहे की प्रत्येक उत्सव सणात त्या त्या ऋतूंमध्ये होणारे वातावरणीय बदल व शरीरात होणारे बदल यांचा विचार केला गेला आहे,व शरीराच्या त्यावेळीच्या गरजेनुसार त्या सणासाठीचा पारंपरीक आहार‌ विहार ठरवला गेला आहे. धार्मिकतेबरोबरच आरोग्याच्या दृष्टीनेही ही सणं आपल्यासाठी महत्वाची आहेत. नवरात्रोत्सवाच्या काळात
वातावरणात उष्णता वाढायला सुरवात झाली आहे. शरीरात देखील अशीच उष्णता वाढत असते.
पावसाळ्यात शरीरात साठलेले पित्त वातावरणातील उष्णतेमुळे कुपीत होतो, आणि शरीरात उष्णता वाढल्याची लक्षणे दिसू लागतात.
पित्तप्रधान‌ प्रकृतीच्या व्यक्ती किंवा ज्यांना पित्ताचा नेहमीच त्रास‌ होतो अशा व्यक्तींमध्ये लघवीस झळ‌ घालणे, अंगावर पित्ताच्या गांधी‌ उठणे,मळमळ उलटी‌ होणे, घणा‌ फुटणे/नाकातून रक्त येणे, डोके दुखणे अशी‌ लक्षणे दिसू लागतात. या वाढलेल्या पित्ताला शांत/शुद्ध करण्यासाठी विरेचन/रक्तमोक्षण या पंचकर्मातील क्रिया उपयोगी आहेत असं आयुर्वेदात सांगीतलं गेलं आहे.जसे चुलीत जाळ जास्ती झाला तर चुलीतील एक दोन लाकडं बाहेर‌ काढून अग्नी कमी करतात तसेच पोटातील उष्णता कमी करण्यासाठी एरंडेल तेल हे सर्वोत्तम औषध वापरले जाऊ शकते.
सर्वसाधारण मोठ्या व्यक्तीला दोन ते तीन चमचे एरंडेल पहाटे चार वाजता किंवा रात्री झोपताना घ्यावे. पोट साफ झाले की कोजागिरी साजरी करावी. पोट साफ न करता मसाला दूध पिले गेले तर दुधाचेच अजीर्ण होते.
म्हणजे पोट साफ असले तरच कोजागिरी‌ साजरी करावी ही पहिली अट. नंतरच दूध प्यावे.
कोजागिरी दिवशी चंद्र आपल्या 16 कलांनी युक्त असतो, आणि चंद्र हा औषधींचा‌‌ कारक आहे,या दिवशी देशाच्या अनेक भागांमध्ये दमारोगावर‌‌ ही वेगवेगळी‌ औषध दिली जातात.
औषधी द्रव्यानी सिद्ध केलेलं दुध हे दम्याच्या रूग्णांमध्ये कोठा साफ करून कफ कमी करण्यास ही उपयुक्त ठरतं.
वाढलेलं पित्त शांत‌ करण्यासाठी गोड पदार्थ, मधुर रसाचे पदार्थ,दुधाचे तुपाचे पदार्थ खाण्यास सांगीतले आहेत.आपल्या देशात वेगवेगळ्या भागांत तांदळाची खीर, नारळाची खीर ,शहाळ्याचे पाणी हे पदार्थ यादिवशी खाल्ले‌ जातात.

मसाला दूध करताना दूध चंद्रप्रकाशात ठेवून आटवावे असे सांगितले आहे.
सकाळी मातीच्या मडक्यात देशी गाईचे दुध तापवून घ्यावे. दुध तापवतानाच त्यात एक लिटर दुधाला तीन वेलची पूड, एक लवंग, पाव जायफळ, अर्धा इंच दालचिनी, अर्धा चमचा सुंठ पावडर, आणि 100 ग्रॅम या प्रमाणे खडीसाखर घालावी. साखर विरघळली, दूध गरम झाले की
उतरवून मडक्यात तसेच ठेवावे. कोमट झाल्यावर ते गाळून पुनः त्याच मडक्यात ओतावे. आणि त्यात केशराच्या पंधरा वीस कांड्या घालाव्यात. आणि याला वरून फडका गुंडाळून ठेवावा. याला दादरा बांधणे असे म्हणतात. आजघडीला मातीचे मडक्यात स्वयपाक करणे शहरी भागात दुर्मिळंच,जे‌ साधन‌ उपलब्ध आहे ते वापरावे व हे दूध सुरक्षित जागी थेट चंद्रप्रकाश पडेल अशा ठिकाणी ठेवावे.
. आज‌च्या काळात कोजागिरी साजरा करण्याची‌ चुकीची‌ पद्धत रूढ‌ होतेय.कोजागिरी गेट टुगेदर,पार्टी,मैफिल व‌ त्यात स्नॅक्स, समोसे,वडापाव,पाणीपुरी,भेळ‌असे नकोते पदार्थ ,सोबत आंबट चवीचे सोस चटणी,अगदी मध्यरात्रीपर्यंत खाऊन लगेच दुध पिलं‌ जातं. याने अजीर्ण ‌होतं,दुध‌आणि आम्लपदार्थ‌ हे विरुद्ध‌ गुणांचे.
नेहेमीप्रमाणे सायंकाळी सात तेक् साडेसात या वेळेत जेवावे आणि मध्यरात्री पर्यंत उपवास करावा. कडकडून भूक लागू द्यावी
व चंद्र डोक्यावर आल्यावर हे दूध घोट घोट सावकाश प्यावे. आटवलेले घट्ट दूध हे फक्त पित्त प्रकृतीच्या,पित्ताचा त्रास असणार्या लोकांसाठी !

दुधात बदाम, काजू पेस्ट, काॅर्नस्टार्च, असे काही वापरू नये याने दुध पचायला जड होते. बेदाणे आणि मनुकाही नकोत.
आयुर्वेदात सागीतल्या गेलेल्या शास्त्रसंगत पद्धतीने तयार केलेले दुध आणि साजरा केलेले उत्सव
सर्वांना सुखकर आणि आरोग्य देणारे होवो, हीच कोजागिरी देवीकडे प्रार्थना !
शतायु भव ।


डॅा‌ भाग्यश्री विरभद्र घाळे
शतायु आयुर्वेद उदगीर,
रा.काँग्रेस डॅाक्टर ‌सेल
उदगीर तालुकाध्यक्ष

About The Author