केंद्र सरकारने महागाई वाढवून सामान्य माणसांचे जगणे कठीण केले – नागराळकर
उदगीर (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने इंधन दरवाढ मोठ्याप्रमाणात केल्यामुळे सर्वसामान्य माणसाला जगणे कठीण झाले आहे. अच्छे दिनच्या खोट्या आश्वासनावर भाळलेल्या भोळ्या-भाबड्या जनतेला आज जगणे कठीण झाले आहे. पेट्रोल, डिझेल व गॅस इंधन दरवाढीच्या विरोधात युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र शासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी निषेध मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला संबोधन करताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंदन भैय्या पाटील नागराळकर बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, उज्वला गॅस योजना आता पूर्णपणे कोलमडून पडली आहे. गोरगरीब महिला पुन्हा शेतात जळतन शोधण्यासाठी भटकंती करत आहेत. तसेच धूर मुक्त घर ही योजना फसवी ठरली आहे. यासोबतच पेट्रोल, डिझेलचे दरवाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीनच्या राशी करणे परवडेनासे झाले आहे. डिझेल, पेट्रोलचे भाव वाढल्यामुळे मशिनच्या आधारावर राशी करणे महाग जाऊ लागले आहे. परिणामतः अगोदरच सोयाबीनचे भाव कमी झाले आहेत, त्यात भरीस भर या महागाईमुळे आणि अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. 11 ते 12 हजार रुपये प्रति क्विंटल भाव असलेल्या सोयाबीनचा भाव सद्यस्थितीत पाच ते सहा हजारावर आला आहे. सोयाबीनला चांगला भाव येईल म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड केली होती. मात्र दुर्दैवाने केंद्र सरकारने सोयाबीन मोठ्या प्रमाणात आयात केल्यामुळे भारतातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मोठी गोची झाली आहे. केंद्र शासनाच्या एकूण सर्वच योजना या फसव्या यांनी गोरगरिबांना लुटणार्या ठरल्या आहेत. त्यामुळे जनतेने भविष्यात सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. असेही विचार त्यांनी स्पष्ट केले .या मोर्चाच्या प्रसंगी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीच्या वतीने देखील निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव मुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष गजानन साताळकर, मनसे मधून राष्ट्रवादीत आलेले नगरसेवक फैयाज शेख, सय्यद ताहेर हुसेन, जर्गर शमसुद्दीन, काँग्रेस मधून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आलेले जानिमियाॅं, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शेख, जि प सदस्य ज्ञानेश्वर पाटील, शहराध्यक्ष समीर शेख, राष्ट्रवादी सेवा दलाचे प्रदेश सचिव नवनाथ गायकवाड, माजी नगरसेवक अनिल मुदाळे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.