रेणुकादेवी मंदिर तीर्थक्षेत्राचा विकास करावा – सचिन दाने यांची आदित्य ठाकरे यांच्याकडे मागणी

रेणुकादेवी मंदिर तीर्थक्षेत्राचा विकास करावा - सचिन दाने यांची आदित्य ठाकरे यांच्याकडे मागणी

लातूर (प्रतिनिधी) : लातूर व शेजारच्या जिल्ह्यांसह सीमावर्ती भागातील भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या रेणापूर येथील रेणुकादेवी मंदिर तीर्थक्षेत्राचा विकास करावा अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन दाने यांनी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सचिन दाने यांच्यासह शिष्टमंडळाने सह्याद्री अतिथीगृहावर आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन हे निवेदन सादर केले. यावेळी माजीमंत्री सचिन अहिर, शिवसेनेचे लोणावळ्याचे नगरसेवक मराठे यांचीही उपस्थिती होती. रेणापूर येथे रेणुका देवीचे मोठे मंदिर आहे. एक जागृत देवस्थान म्हणून रेणापुरची ख्याती आहे. विविध बांधकाम शैलींचा नमुना असणाऱ्या या मंदिरात हलणारी दीपमाळ आहे.सुमारे ३५ फूट उंचीची ही इमारत पूर्णपणे हलते. याशिवाय या परिसरात अनेक पुरातन वास्तु आहेत. त्यामुळे तीर्थक्षेत्र विकास तसेच पुरातन वास्तू संशोधन करण्यासाठी अभ्यास गट नेमावा. पर्यटन विकास अंतर्गत निधी उपलब्ध करून द्यावा.तालुक्यातील शेतकऱ्यांना पीकविमा मिळवून द्यावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यासंदर्भात लवकरच अभ्यास गट नेमून संशोधनाचे कार्य सुरू करण्यात येईल, असे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी या शिष्टमंडळाला दिले. यावेळी लातूर तालुका प्रमुख ॲड.प्रविण मगर, चेतन होळकर, रणझुंजार प्रतिष्ठानचे धनंजय भिसे, शिवप्रतापसिंह कोळी, ॲड. शिवयोगी चपने,अंगद सोमवंशी, अभय मराठे यांचीही उपस्थिती होती. कलाकार राजेश कुलकर्णी यांच्याकडून तयार करून घेतलेले पेंटिंग यावेळी आदित्य ठाकरे यांना भेट देण्यात आले.

About The Author