जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी, लघुउद्योजकांना न्याय देणार – लक्ष्मी ताई भोसले

जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी, लघुउद्योजकांना न्याय देणार - लक्ष्मी ताई भोसले

 उदगीर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून लोकनेते स्व. चंद्रशेखरजी भोसले साहेब यांनी लातूर जिल्ह्यातील गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी, लघुउद्योजक, सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून मोठे काम सुरू केले होते. जनतेची सेवा हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून चंद्रशेखर भोसले साहेब काम करत होते. त्यांचा वसा कायम ठेवून आपण देखील सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब, पालकमंत्री अमित भैया देशमुख, राज्यमंत्री संजयजी बनसोडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबासाहेब पाटील आणि सर्व जेष्ठ नेते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला लोकाभिमुख करण्यासाठी आपण प्रयत्न करू. असे आश्वासन लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवनिर्वाचित संचालिका श्रीमती लक्ष्मीताई भोसले यांनी दिले.

 पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, लोकनेते चंद्रशेखर भोसले यांच्या अकाली जाण्याने कार्यकर्ते सैरभैर झाले होते. त्या सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांना न्याय देण्यासाठी ही आपण कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे, असे त्यांनी सांगितले. सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा मध्यवर्ती बँक ही जणू कल्पवृक्ष बनली आहे. त्यामुळे या बँकेच्या माध्यमातून शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, उद्योजक यांना अर्थसाह्य देऊन सहकार्य करून प्रगतीच्या गतीने घेऊन जाणार आहे असे त्यांनी याप्रसंगी सांगितले.

 उदगीर परिसरातील बहुसंख्य विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन, संचालक आणि लोकनेते चंद्रशेखर भोसले यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वतीने लक्ष्मीताई भोसले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.सत्कार करण्यात आला याप्रसंगी बोलताना लक्ष्मीताई भोसले म्हणाले की, तुम्ही सर्व माझे पाठबळ आहात. नेत्यांनी आणि मतदारांनी दाखवलेला माझ्यावरचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. कार्यकर्त्यांनी खचून न जाता हिमतीने पुढे येऊन कार्य करावे. त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यात मलाही आनंद मिळेल, असे स्पष्ट केले.

 याप्रसंगी लोकनेते चंद्रशेखर भोसले प्रतिष्ठानच्या अध्यक्षा प्रितीताई चंद्रशेखर भोसले, रामेश्वर बिरादार जकनाळकर, रमेश पाटील तपशाळकर, कुमार पाटील, धनाजी मुळे यांच्यासह चेअरमन आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author