व्यापार – उद्योगवृध्दीसाठी मनपा पोषक वातावरण निर्माण करणार – महापौर विक्रांत गोजमगुंडे
लातूर (प्रतिनिधी) : लातूर शहरातील व्यापार आणि उद्योगाच्या वृध्दीसाठी लातूर शहर महानगरपालिका कटिबद्ध असून, त्यासाठी मनपा पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी पावले उचलत आहे, अशी ग्वाही महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी येथे दिली. शहरातील फ्रेश पॉईंट सुपर मार्केटच्या मोतीनगर भागातील दुसऱ्या शाखेचा शुभारंभ रविवारी (24 ऑक्टोबर)महापौरांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी दयानंद शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी महापौर सुरेशजी पवार, मनपा स्थायी समिती सभापती विधीज्ञ दीपक मठपती, जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट संघटनेचे अध्यक्ष रामदास भोसले यांची उपस्थिती होती. या प्रसंगी कॉर्पोरेटर्स संगीत रंदाळे , शकुंतलाताई गाडेकर, शीतलताई मालू, सुनिताताई चाळक, वर्षाताई कुलकर्णी , श्वेताताई लोंढे, भाग्यश्रीताई कौळखेडे यांची विशेष उपस्थिती होती. त्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविकात संचालक ईश्वर बाहेती यांनी फ्रेश पॉईंट उद्योगा मागील भूमिका विस्ताराने स्पष्ट केली. या सुपर मार्केटच्या दोन्ही शाखांच्या माध्यमातून जवळपास 60 जणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे ते म्हणाले. संचालक लक्ष्मीकांत धूत यांनी यावेळी बोलताना फ्रेश पॉईंट सुपर मार्केटच्या शेड उभारणीत सहकार्य केलेल्या सहकारी व कारागिरांचा आवर्जुन उल्लेख केला. या सुपर मार्केट च्या निर्माणाची संकल्पना गेल्या 10 वर्षापासून आपल्या मनात घोळत होती. काही समविचारी मित्रांना बरोबर अखेर अडीच वर्षांपूर्वी आम्ही पहिली शाखा सुरू केली आणि अल्पवधीतच ही दुसरी शाखाही आज सुरू होत असल्याचे त्यांनी सांगितले. लातूरकरांचा या उद्यम उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळत असून त्यामुळे आम्ही सर्व संचालक भारून गेलो आहोत, असे सांगून त्यांनी ग्राहकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
सर्व संचालकांचे पालक ह्या नात्याने डॉ. हंसराज बाहेती यांनी यावेळी आशीर्वादपर मनोगत व्यक्त केले. ग्राहकसेवेत तत्परता, व्यावसायिक सचोटी, दर्जेदार माल आणि सौजन्यपूर्ण वागणूक या व्यावसायिक चतुसुत्रीचे पालन हेच यशाचे गमक असल्याचे ते म्हणाले. संचालक व ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे यांनी या फ्रेश पॉईंट ची उभारणी संपूर्णपणे नियमानुसार व कायदेशीर बाबींचे पालन करूनच केली असल्याचे सांगितले. लातूरच्या वैभवात भर घालणाऱ्या व्यापार उदिमाच्या आस्थापनाना राज्यकर्त्यांनी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. उद्घाटनाचे औचित्य साधून काही कर्मचारी, कारागीर यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तर, फ्रेश पॉईंट चे शंभर टक्के संगणकीकरण करणारे युवा तंत्रस्नेही विश्वजित बाहेती आणि संदेश धूत यांचा महापौर गोजमगुंडेजी आणि लाहोटीजी यांचा हस्ते गौरव करून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे बहारदार सूत्र संचालन सौ. पूजाताई धूत यांनी, तर आभारप्रदर्शन विष्णुजी सारडा यांनी केले.