राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग आणि इतर रस्त्यांसाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध होणार ना. संजय बनसोडे

राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग आणि इतर रस्त्यांसाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध होणार ना. संजय बनसोडे

उदगीर (एल.पी. उगिले) : उदगीर पंचक्रोशीतील विविध महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग आणि जोड रस्त्यांना निधी उपलब्ध व्हावा. तसेच अतिरिक्त नवीन राष्ट्रीय महामार्ग निर्माण व्हावेत. यासाठी राज्यमंत्री ना. संजय बनसोडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन वेगवेगळ्या मार्गांसाठी लागणार्‍या निधी संदर्भात निवेदन सादर केले.
सध्या महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत 4844 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे जाळे निर्माण होते आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात गतिमान वाहतूक आणि गतीशिल संपर्क शक्य होणार आहे. या गतिमान रस्त्यामुळे कृषी, वाहतूक, औद्योगिक विकास, प्रवास त्यांना गती येणार आहे .याबद्दल ना. संजय बनसोडे यांनी ना. नितीन गडकरी यांचे अभिनंदन केले. तसेच नव्याने घोषित केलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 या संदर्भामध्ये रेनापुर ते आष्टामोड, तिवटघाळ -रवी -देगलूर -आदमापुर फाटा- कारला फाटा या विस्तारा बद्दल निवेदन देताना सदरील रस्ता चौपदरीकरणाचा व्हावा तसेच इतरही रस्त्यांचे श्रेणी सुधारित करण्यात यावीत. अशी प्राधान्याने मागणी केली.
या रस्त्यासाठी अर्थात रेनापुर ते आष्टामोड या 18 किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी 155 कोटी, तिवटघाळ ते रावी या 33 किलो मीटर राष्ट्रीय महामार्गासाठी 177 कोटी, रावी ते देगलूर या 29 किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी 180 कोटी आणि देगलूर ते महाराष्ट्र – तेलंगणा सीमा भागापर्यंत 21 किलोमीटर रस्त्यासाठी 109 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची मागणी केलेली आहे. यासोबतच चाकूर -किनी- येल्लादेवी- वाढवणा- गुडसूर या रस्त्याचे रुंदीकरण व सुधारणा तसेच रस्त्यातील पुलाचे बांधकाम यासाठी 76 कोटी व माळी हिप्परगा- डोंगरगाव- कोदळी- मांजरी- आवलकोंडा रोड या रस्त्यासाठी 50 कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. तसेच रत्नागिरी- तुळजापूर- औसा -आष्टामोड- नांदेड या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 261 मार्गाला शिरूर ताजबंद ते उदगीर रस्ता जोडण्यात यावा.

या रस्त्याचे रुंदीकरण व सुधारणा करून आवश्यक तो निधी उपलब्ध करून द्यावा. उदगीर ते शिरुळ आनंतपाळ या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात यावा. अशा पद्धतीचा आराखडा बनवून केंद्रीय रस्ते विकास मंत्रीना. नितीन गडकरी यांच्याकडे सादर केला आहे. गडकरी यांनी या सर्व रस्त्यांना मंजुरी देण्याच्या दृष्टीने आणि निधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सकारात्मक प्रतिसाद देत आश्वासक अशा पद्धतीचे शेरे सदरील निवेदनावर दिले आहेत.

गेल्या कित्येक दिवसापासून लातूर जिल्ह्यातील कित्येक रस्ते खराब झाले आहेत. कित्येक रस्त्यांना श्रेणीसुधार आणि चौपदरीकरणाची गरज आहे. ते ही प्रलंबित कामे तात्काळ करण्यात यावीत. यादृष्टीने राज्यमंत्री ना. संजय बनसोडे यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या अनुषंगाने तब्बल तासभर चर्चा झाल्यानंतर या सर्व आराखडा यांचा अभ्यास करून उदगीर पासून थेट सीमा भागापर्यंत रस्त्यांच्या विकासासंदर्भात आराखडा मंजूर करण्याचे आश्वासन दिले. महाराष्ट्र- कर्नाटक- तेलंगणा या सीमा भागातील राष्ट्रीय महामार्गांना, विविध रस्त्यांना मंजुरी देण्याची ही स्वतंत्र मागणी संजय बनसोडे यांनी केली होती, त्या ही मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन रस्ते पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याचेही राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

केवळ दोन वर्षाच्या कालावधीच्या आत राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी उदगीर विधानसभा मतदार संघाचाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा तयार करून वेगवेगळ्या खात्याकडून कोट्यावधीचा निधी उपलब्ध करून आणल्याबद्दल मतदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच अशाच पद्धतीने गतिमान विकास कामे करून गेल्या कित्येक वर्षापासून विकासापासून दूर असलेल्या उदगीर विधानसभा मतदारसंघाचा बॅकलाॅग त्यांनी भरून काढावा. अशी अपेक्षाही जनतेकडून आता व्यक्त होते आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, अशीही माहिती संजय बनसोडे यांनी दिली. तसेच लातूर जिल्ह्यातील विविध रस्त्यांना निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्याबद्दल ना.गडकरी यांचे आभारही त्यांनी व्यक्त केले आहेत.

About The Author