लातूर व नांदेड जिल्हा परिषदेविरोधात विभागीय आयुक्तांकडे तक्रार

लातूर व नांदेड जिल्हा परिषदेविरोधात विभागीय आयुक्तांकडे तक्रार

बेकायदा शिक्षक आंतरजिल्हा बदली प्रकरण

लातूर (प्रतिनिधी) : ग्रामविकास विभागाच्या शिक्षक आंतरजिल्हा बदली धोरणानुसार शिक्षकांच्या निवड प्रवर्गच्या आधारे आंतरजिल्हा बदल्या केल्या जातात. परंतु नांदेड जिल्हा परिषदेमधून खोटा निवड प्रवर्ग नोंदवून लातूर जिल्हा परिषदेमध्ये बदली मिळवलेल्या शिक्षका संदर्भात खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघाने विभागिय आयुक्ताकडे लातूर व नांदेड जिल्हा परिषदेविरोधात तक्रार दाखल केली आहे.

राज्याच्या ग्रामविकास विभागाने सन 2017 साली शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्या ऑनलाइन पद्धतीने करण्याचे नवीन धोरण जाहीर केले होते. यात शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या ह्या त्यांच्या निवड प्रवर्गानुसार केल्या जात होत्या. लातूर जिल्हा परिषदेमध्ये सन 2018 साली तब्बल 331आंतरजिल्हा बदल्या झाल्या होत्या. परंतु यातील अनेक शिक्षकांनी त्यांचा निवड प्रवर्ग खोटा नोंदवून बेकायदा बदल्या मिळवल्या होत्या. शिक्षक बदल्यांच्या ऑनलाइन पोर्टलवर ज्या शिक्षकांनी त्यांचा निवड प्रवर्ग चुकीचा नोंदवला होता त्या शिक्षकांना तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शासनाचे मार्गदर्शन घेऊन कार्यमुक्त करून परत मूळ जिल्ह्यात पाठवले होते.

श्रीमती पार्वता रामराव तोतावाड व श्री प्रमोद विठोबा माळी या दोन शिक्षकांनी नांदेड जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असताना शिक्षकांच्या ऑनलाईन बदली पोर्टलवर त्यांचा निवड प्रवर्ग खूला असताना इतर मागास वर्ग असा चुकीचा नोंदवून लातूर जिल्हा परिषदेमध्ये आंतरजिल्हा बदली मिळवली आहे. या शिक्षकांनी निवड प्रवर्ग खुला नोंदवला असता तर त्यांची बदली झाली नसती. परंतु त्यांनी ओबीसी असा प्रवर्ग नोंदवल्यामुळे त्यांचे नाहरकत प्रमाणपत्र 2011 च्या नंतरचे असतानाही लातूर जिल्हा परिषदेमध्ये तात्काळ बदली झाली. लातूर जिल्हा परिषदेने तसेच नांदेड जिल्हा परिषदेने ऑनलाइन बदली पोर्टलवर नोंदवलेला प्रवर्ग व त्यांच्याकडे उपलब्ध असलेली कागदपत्रे यांची तपासणी करत असताना हलगर्जीपणा करून या दोघांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. या गंभीर प्रकरणाविरोधात लातूर व नांदेड जिल्हा परिषदेकडे वारंवार पुराव्यासह तक्रार देऊनदेखील त्याची वर्षभरात कोणतीही दखल न घेतल्याने खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघाने विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली आहे.

तोटावाड व माळी या दोन शिक्षकांच्या बेकायदा आंतरजिल्हा बदल्यास जबाबदार कर्मचारी, अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून निलंबनाची कारवाई करावी, सन 2015 साली झालेल्या बेकायदा दुबार आंतरजिल्हा बदल्या कायदेशीर ठरवणाऱ्या चौकशी समितीतील सदस्यांची चौकशी व्हावी, भ.ज.क. प्रवर्गातून लातूर जिल्हा परिषदेमध्ये रुजू झालेल्या शिक्षकांची नोंद त्यांच्या मागासवर्गात करावी, नांदेड जिल्हा परिषदेमधून लातूर जिल्हा परिषदेकडे ना हरकत प्रमाणपत्रची खोटी तारीख नोंदवून बदली झालेल्या शिक्षकांची पदस्थपणा रद्द करावी , आंतरजिल्हा बदलीने उपस्थित झालेल्या शिक्षकांना पदस्थपणा देताना बेकायदेशीरपणे दिलेला संवर्ग-2 चा लाभ रद्द करून त्यांच्या पदस्थापना रद्द कराव्यात अशा अनेक मागण्या महासंघाचे राज्यनेते सनिदेवल जाधव यांनी विभागीय आयुक्तांकडे केल्या आहेत.

खुला टू खुला व्हाया ओबीसी

श्रीमती पार्वता तोटावाड व प्रमोद माळी यांनी त्यांचा खरा निवड प्रवर्ग खूला असताना बदली पोर्टल वर ओबीसी असा नोंदवून लातूर जिल्हा परिषदेमध्ये आंतरजिल्हा बदली मिळवली . लातूर जिल्हा परिषदेने त्यांना परत न पाठवता त्यांना खुल्या प्रवर्गात नियुक्ती दिली. त्यामुळे ही बदली खुला टू खुला व्हाया ओबीसी झाली असेच म्हणावे लागेल.

About The Author