राष्ट्रवादीच्या खेळीने एम आय एम आघाडीची शक्ती वाढणार – निवृत्ती सांगवे

राष्ट्रवादीच्या खेळीने एम आय एम आघाडीची शक्ती वाढणार - निवृत्ती सांगवे

उदगीर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय दलित अधिकार मंच आणि एम आय एम यांनी संयुक्तपणे दलित मुस्लिम ऐक्य मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यासाठी एम आय एम चे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील येणार होते. मात्र त्यांची सभा झाल्यास एम आय एम ची ताकद जास्त वाढेल, अशी धास्ती घेऊन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ही सभा जातीय तेढ निर्माण करू शकेल, या पार्श्वभूमीवर रद्द करण्यासाठी प्रशासनावर दबाव आणला.असा आरोप दस्तुरखुद खा.जलिल आणि राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे) यांनी केला आहे. नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय दलित अधिकार मंच आणि एम आय एम यांनी आघाडी केली असून त्याच्या पूर्वतयारीची बैठक औरंगाबाद येथे खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच संपन्न झाली. या बैठकीच्या आधारावरच उदगीर येथे दलित मुस्लिम ऐक्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा यशस्वी होणारच असे चित्र असताना सत्तेचा दुरुपयोग करून राजकारणी पुढाऱ्यांनी हा मेळावा रद्द व्हावा म्हणून इम्तियाज जलील यांच्या सभेला दिलेली परवानगी नाकारली, आणि राजकीय डाव खेळला.
मात्र या खेळीने राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच अडचणीत येणार, असेच चित्र उदगीर शहरात निर्माण झाले आहे. एम आय एम च्या पाच नगरसेवकांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन उदगीर मधून एम आय एम संपली अशी वल्गना केली जात होती मात्र ही वल्गना, वल्गनाच ठरणार. कारण दलित मुस्लिम ऐक्य होऊन एम आय एम आणि राष्ट्रीय दलित अधिकार मंच यांच्या आघाडीलाच एक गठ्ठा मते मिळणार आहेत. असे चित्र आहे, अशीही माहिती निवृत्तीराव सांगवे सोनकांबळे यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या पाच नगरसेवका मुळे एम आय एम ची शक्ती कमी झालेली नाही. उलट एकनिष्ठ कार्यकर्त्यांना आता संधी मिळणार आहे. पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना जनता कधीच माफ करत नसते, हा इतिहास आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा भ्रमनिरास झाल्याशिवाय राहणार नाही. एम आय एम आणि राष्ट्रीय दलित अधिकार मंच नगरपालिकेच्या निवडणुकीत निर्णायक गट राहणार आ.हे अशीही शाश्‍वती सांगवे (सोनकांबळे) यांनी दिली आहे.

About The Author