उदगीर येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी 75 लाखाचा निधी मंजूर
लातूर (प्रतिनिधी) : उदगीर शहरातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे सुशोभिकरणासाठी शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 75 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून उदगीर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा व त्याच्या सुशोभीकरण करण्यात येणार आहे याबाबतचा शासन निर्णय झाला असून शहराच्या वैभवात आणखी भर पडणार आहे. याचे काम त्वरित सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.
उदगीर शहराला ऐतिहासिक वारसा आहे. इतिहासात या शहराला सांस्कृतिक महत्त्व आहे. अशा या उदगीर शहराचा पायाभूत विकास जलद गतीने होत आहे. यासोबत शहराचा सांस्कृतिक विकासासाठी भरीव आर्थिक तरतूद शासन स्तरावरून करण्यात येत आहे. शहरात छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृह, लिंगायत भवन, मुस्लिम शादी खाना,बौध्द विहार,नुकतेच मंजूर केलेले रेड्डी भवन उभे राहात आहेत. या सोबत भारतीय संविधानाचे जनक, क्रांतीसूर्य महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करणे, नवीन पुतळा उभा करण्याबाबत अनेक दिवसापासून नागरिकांची मागणी होती. या मागणीची शासनस्तरावर पाठपुरावा करून शासनाकडून 75 लाख रुपयांचा निधी मंजूर करुन घेण्यात आला आहे. येणाऱ्या काळात समाजाला प्रेरणाशक्ती, ऊर्जा देणारे समतेचे दूत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पुतळा आकर्षक दर्जादार व सुशोभीणीय करण्यात येणार आहे. हा पुतळा उदगीर शहराच्या सौंदर्यात आणखी भर घालेल. हे काम लवकरच सुरू होणार आहे. अशी माहिती राज्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल, पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.