मराठीच्या वैभवशाली परंपरेचा मराठी भाषकांना सार्थ अभिमान – डॉ. विठ्ठल जंबाले यांचे प्रतिपादन

मराठीच्या वैभवशाली परंपरेचा मराठी भाषकांना सार्थ अभिमान - डॉ. विठ्ठल जंबाले यांचे प्रतिपादन

अहमदपूर (गोविंद काळे) : मध्ययुगीन काळात महानुभावांनी आणि वारकऱ्यांनी मराठीतील दर्जेदार साहित्य लिहून, मराठी भाषेला कलात्मक उंचीवर नेले. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी या मराठी भाषेला राज्य कारभारात स्थान दिल्यामुळे ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या मराठी भाषेचा सार्थ अभिमान असल्याचे प्रतिपादन डॉ.विठ्ठल जंबाले यांनी केले. स्वा.रा.ती.म. विद्यापीठच्या मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य व देगलूर महाविद्यालय,देगलूर येथील मराठी भाषा व वाड्:मय विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. विठ्ठल जंबाले हे येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ” मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उद्घाटन सोहळा” कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. जंबाले बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते.आभासी तथा दूर दृश्य (झूम) माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात “मराठी भाषेसमोरील आव्हाने ” या विषयावर डॉ. जंबाले यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान झाले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, ” मराठी ही आज जगातील अनेक देशांमध्ये बोलली जाणारी भाषा असून, मराठीत दर्जेदार साहित्य होत आहे. तसेच सर्व वाड्:मय प्रकारांनी मराठी भाषा समृद्ध आहे.ज्या मराठी मातीत आपण जन्मलो त्या मातीत मराठी भाषेबद्दलचा अभिमान आपण बाळगला पाहिजे.आपण कितीही प्रगती केली तरीही आपण आपली संस्कृती जपली पाहिजे. तिचा विसर पडता कामा नये.म्हणून मराठीला वाव द्या व जगास मी व माझी भाषा ‘मराठी’ आहे, हे गर्वाने सांगा” असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अनिल मुंढे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. मारोती कसाब यांनी केले तर आभार प्रदर्शन कु. मोहिनी मेकाले यांनी केले. तर ग्रंथपाल प्रा.पी.एम. इंगळे यांनी तांत्रिक सहाय्य केले. या कार्यक्रमास दूरदृश्य प्रणालीचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.

About The Author