महाआघाडी सरकारकडून धनगर समाजावर अन्याय – नागनाथ बोडके

महाआघाडी सरकारकडून धनगर समाजावर अन्याय - नागनाथ बोडके

उदगीर ( प्रतिनिधी ) : महाराष्ट्रातील आघाडी सरकारने वेगवेगळ्या जाती-धर्माच्या, समाजाच्या विविध विकासाच्या मागणीच्या संदर्भात गांभीर्याने विचार करून त्यांना विकास निधी देण्यात आला आहे. मात्र धनगर समाजावर सतत अन्याय केला जातो आहे. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. गेल्या कित्येक वर्षापासून केवळ विकासाची आश्वासने देऊन झुलवत ठेवले जाते आहे. उदगीर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी बागेत पुण्यश्लोक अहिल्यादेवीचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे आश्वासन कित्येक वेळा दिले गेले आहे. मात्र त्याची पूर्तता कधीच केली जात नाही. अहिल्यादेवी बगीच्या लोकार्पण सोहळ्याच्या प्रसंगी उदगीरचे आमदार तथा राज्यमंत्री नामदार संजय बनसोडे हे स्वतः उपस्थित होते. काँग्रेसच्या नेत्यांनी, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी धनगर समाजाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या पोकळ घोषणा केल्या, मात्र ठोस असा कोणताही निधी दिला नाही. अशी माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष नागनाथ भाऊ बोडके यांनी दिली आहे.

सर्व समाजासाठी समाज मंदिर, सभागृह, विद्यार्थ्यासाठी वसतिगृह, वेगवेगळ्या समाजाच्या मुलींसाठी शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून त्यांच्यासाठी स्वतंत्र वसतिगृह यासाठी निधी उपलब्ध केला जातो आहे. स्मशानभूमी च्या संरक्षण भिंती साठी, शादीखाना तसेच विविध उपक्रमासाठी ही इतर समाजाला निधी दिला जातो आहे. मात्र धनगर समाजावर सतत अन्याय केला जातो आहे.हे आपण खपवून घेणार नाही. महाविकास आघाडीला त्याची मोठी किंमत भोगावी लागेल. असाही इशारा याप्रसंगी रासपचे युवानेते नागनाथ भाऊ बोडके यांनी दिला आहे.

About The Author