जैव तंत्रज्ञानच्या विद्यार्थ्यांनी उद्योजक बनावे – पाटील
कॉक्सिटमध्ये जैवतंत्रज्ञानदिनानिमित्त विविध स्पर्धा संपन्न
लातूर (प्रतिनिधी) : जैव तंत्रज्ञानाचे महत्व अनन्यसाधारण आहे. हा विषय दैनंदिन व्यवहाराशी निगडित असल्याने विद्यार्थ्यांनी जैवतंत्रज्ञानाचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उद्योजक बनावे, असे आवाहन रॉयल एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख डॉ. एम. आर. पाटील यांनी केले. जैव तंत्रज्ञानदिनानिमित्त (बायो टेक्नॉलॉजी डे) येथील संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयात (कॉक्सिट) पोस्टर्स सादरीकरणासह विद्यार्थ्यांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी ते बोलत होते. विजेत्या विद्यार्थ्यांना पोरितोषिकांनी गौरविण्यात आले. यावेळी कॉक्सिटचे प्राचार्य डॉ. एन. एस. झुल्पे, उपप्राचार्य डॉ. बी. एल. गायकवाड, उपप्राचार्य डॉ. डी. आर. सोमवंशी, उपप्राचार्य व्ही. व्ही. भोसले, ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर प्रा. कैलास जाधव, विभागप्रमुख प्रा. ईश्वर पाटील, प्रा. माकणीकर उपस्थित होते. यावेळी डॉ. एम. आर. पाटील म्हणाले, जैवतंत्रज्ञान विषयाचे महत्व अनन्यसाधारण आहे. व्यवहारातील प्रत्येक गोष्टीत जैवतंत्रज्ञान विषयाचा समावेश होतो.
कृषी जैवतंत्रज्ञानाचा शेतीसाठी मोठा फायदा आहे. यामुळे या विषयाचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांनी जैवतंत्रज्ञान आत्मसात करून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उद्योजक बनण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. या क्षेत्रात ‘स्काय ईज द लिमिट’ एवढ्या मोठ्या संधी व वाव आहे, असे ते म्हणाले. यावेळी महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांसाठी पोस्टर्स सादरीकरण स्पर्धा घेण्यात आली. त्याचप्रमाणे लसीकरण विकास (वॅक्सीन डेव्हलपमेंट), कृषी जैवतंत्रज्ञान (ऍग्रीकल्चर बायो टेक्नॉलॉजी) व सूक्ष्मजीव वाढवण्याचे तंत्र (मायक्रोबियल कल्चर टेक्नीक) या विषयांवरही स्पर्धा घेण्यात आल्या. सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना डॉ. पाटील व प्राचार्य डॉ. एन. एस. झुल्पे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी आरती मुळे, ऋतुजा बंडाले, स्मिता गित्ते, कांचन शेट्टी,प्रणीता कदम, सोमनाथ भोसले, ऐश्वर्या कसबे व रविराज पाटील या विद्यार्थ्यांना पोरितोषिकांनी गौरविण्यात आले.