समाजकार्याचा गौरव हेच टायगर सेनेचे उद्दिष्ट – जॅकी दादा सावंत

समाजकार्याचा गौरव हेच टायगर सेनेचे उद्दिष्ट - जॅकी दादा सावंत

उदगीर (प्रतिनिधी) : समाज कार्य करत असताना आनंद तर मिळतोच, त्यासोबतच दर्जेदार काम केले तर समाजाकडून प्रतिष्ठाही मिळते. समाजकार्य करून गोरगरिबांची सेवा करणे, शोषित उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देणे. हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवूनच आपण टायगर सेना स्थापन केली असल्याचे स्पष्टीकरण टायगर सेनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष जॅकी दादा सावंत यांनी केले.

 ते उदगीर तालुक्यातील मौजे होनाळी येथे ग्रामपंचायत व टायगर सेना शाखेच्यावतीने जॅकी दादा सावंत तसेच टायगर सेनेचे राष्ट्रीय महासचिव अजय भैय्या सावंत, उदगीर तालुका अध्यक्ष वैजनाथ झुंकलवाड यांचा सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते.

 पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, आजही ग्रामीण भागात अनेकांना शासकीय कामांमध्ये, लोक कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यामध्ये खूप अडचणी येत आहेत. अशा गोरगरिबांना शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती देऊन त्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी टायगर सेनेचे कार्यकर्ते कार्य करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊनच आज मराठवाडाभर टायगर सेनेच्या शाखा दिसत आहेत. कार्य करणाऱ्यांना समाजाने साथ दिली, प्रोत्साहन दिले तर दर्जेदार काम करायला उत्साह येईल, असेही सांगितले. याप्रसंगी टायगर सेनेचे प्रवक्ते बबनराव घंटे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष पाटील, जिल्हा सरचिटणीस नरसिंह पाटील, संदीप चौधरी, संदीप पाचंगे, शुभम गुरनाळे इत्यादी प्रमुख कार्यकर्ते आणि नेते मंडळी उपस्थित होते. प्रामुख्याने होनाळी येथील हरिनाम सप्ताह सोहळ्यातील भाविक भक्त, ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच यांच्या हस्ते टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जॅकी दादा सावंत यांचा सत्कार करण्यात आला.

About The Author