महात्मा फुले हेच भारतीय बहुजनांचे तत्त्ववेत्ते होते – मधुकरराव पाटील गुरूजी

महात्मा फुले हेच भारतीय बहुजनांचे तत्त्ववेत्ते होते - मधुकरराव पाटील गुरूजी

फुले महाविद्यालयात ‘बहुजन तत्त्ववेत्ता महात्मा फुले ‘ ग्रंथाचा स्मृतीदिनानिमित्त प्रकाशन समारंभ

अहमदपूर, ( गोविंद काळे) : महात्मा जोतिराव फुले हे केवळ समाजसुधारक नव्हते किंवा शैक्षणिक चळवळीचे जनकच नव्हते; तर ते अखिल भारतातील बहुजनांचे एक महान तत्त्ववेत्ता होते असे स्पष्ट प्रतिपादन मधुकर पाटील यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या वतीने महात्मा फुले यांच्या १३१ व्या स्मृतिदिना निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षक मधुकरराव पाटील गुरूजी यांच्यासह उपप्राचार्य डॉ. डी. डी. चौधरी, ‘ बहुजन तत्त्ववेत्ता: महात्मा फुले ‘ या ग्रंथाचे संपादक डॉ. सतीश ससाणे, डॉ. प्रशांत बिरादार, डॉ. बब्रुवान मोरे, प्रा. परमेश्वर इंगळे, डॉ. पांडुरंग चिलगर, डॉ. मारोती कसाब यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना मधुकर पाटील म्हणाले की, महात्मा फुले यांच्या कार्याचा पुन्हा पुन्हा आदर्श घेण्याची गरज या काळात निर्माण झाली आहे. फुले दाम्पत्याने केलेले सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्य केवळ अद्वितीय असून, महात्मा फुले यांच्या कार्याच्या विविध पैलूंना उजेडात आणण्याचे काम ‘ बहुजन तत्त्ववेत्ता: महात्मा फुले ‘ या ग्रंथाच्या संपादकांनी केलेले आहे. ही खऱ्या अर्थाने महात्मा फुले यांना वैचारिक आदरांजली ठरते, असेही ते म्हणाले.
यावेळी महात्मा फुले महाविद्यालयाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘ बहुजन तत्ववेत्ता: महात्मा फुले’ या ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सतीश ससाणे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळाल्याबद्दल, डॉ. पांडुरंग चिलगर यांचा पहिला विद्यार्थी पीएच. डी. झाल्याबद्दल तसेच डॉ. बब्रुवान मोरे यांनी हिंदी विषयात एम. ए. मध्ये विशेष प्राविण्य मिळवल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केला. तर यावेळी संपादक डॉ. सतीश ससाणे, डॉ. बब्रुवान मोरे यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रशांत बिरादार यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. मारोती कसाब यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी ‘कोविड-१९’ चे नियम पाळून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ‘ वंदे मातरम’ गीताने झाली तर समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.

About The Author