ग्रामसेवक विष्णू भिसे यांच्या कामाची चौकशी करा
पाखरसांगवी ग्रामपंचायत सदस्यांची मागणी
लातूर (प्रतिनिधी) : लातूर तालुक्यातील पाखरसांगवी ग्रा. पं. कार्यालय येथील ग्रामसेवक विष्णू भिसे यांच्या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
पाखरसांगवी येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक विष्णू भिसे हे गेली अनेक वर्ष झाले सदस्यांना विश्वासात न घेता काम करत आहेत तसेच ग्रामपंचायत सदस्यांना मासिक बैठकीबाबत कोणत्याही प्रकारची नोटीस किंवा कल्पना दिली जात नाही. त्याचबरोबर गावातील विकास कामाबद्दल विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे ग्रामसेवकाकडून मिळत आहेत. माहिती अधिकारात माहिती मागवली असतानादेखील तीन वर्षापासून माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. पाखरसांगवी ग्रामपंचायत कार्यालय येथील अनेक कामात मोठ्या प्रमाणात अनागोंदी झालेली असल्यामुळे त्याची चौकशी करून ग्रामसेवक विष्णू भिसे यांची बदली करण्यात यावी व त्यांची खातेनिहाय चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य अक्षय देशमुख, ओम सुनापे, क्रांती शिंदे, वनिता बोयणे, आयाज पठाण, शामला चव्हाण, अनिता कांबळे, राधाबाई शिंगण यांनी एका निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.