स्वच्छ सर्वेक्षण अभियानात उदगीर नगर परिषद उदगीर देशात ४८ व्या स्थानी
उदगीर (अॅड. एल.पी.उगीले) : देशभरात राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षणात या वर्षी देशभरातील एकूण ४३२० नगर परिषद, नगर पंचायत व महानगरपालिकांनी सहभाग घेतला होता. उदगीर शहर मागील वर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये ५५ व्या स्थानी होते या वर्षी स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करीत उदगीर शहराने ४८ वा क्रमांक व राज्यात १६ वा क्रमांक पटकाविला आहे. तसेच कचरा मुक्त शहरामध्ये १ स्टार मिळवत लातूर महानगरपालिके पाठोपाठ जिल्ह्यात स्टार रँकिंग मिळवणारी एकमेव नगर परिषद ठरली आहे.
आजपर्यंत नगर परिषदेमार्फत शहरातील ४६८९ लाभार्थ्यांना घरगुती शौचालय पुरविण्यात आले तसेच ११ सामुहिक व १० सार्वजनिक शौचालय शहरात आहेत यामुळे सन २०१८ साली उदगीर शहराला संपूर्ण हागणदारीमुक्त शहर (ODF) असे मानांकन मिळाले होते. यापुढे जाऊन नगर पालिकेने मैला निस्सारण व प्रकीयेकारिता शहरात २०KLD क्षमतेचे मैलाप्रक्रिया केंद्र (FSTP) उभारून २०१९ साली ODF++ हे मानांकन मिळवले व अद्याप पर्यंत हे मानांकन अबाधित ठेवले आहे. येणाऱ्या काळात शहरातून तयार होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याकरिता प्रक्रिया केंद्र प्रस्तावित आहे.
दरवर्षी केंद्र शासनातर्फे घनकचरा व्यवस्थापन या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरांना “कचरा मुक्त शहर” तारांकन दिले जाते. या वर्षी पहिल्याच वेळी उदगीर शहराला कचरा मुक्त शहर १ स्टार हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. याकरिता शहरातील नागरीकांमार्फत ओला, सुका व हानिकारक कचरा वेगळा देण्याची सवय व नगर पालिकेमार्फत शास्त्रोक्त पद्धतीने कचरा प्रक्रिया करणे कारणीभूत ठरले. येणाऱ्या काळात अत्याधुनिक यंत्रांमार्फत टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तूंची निर्मित करण्यात येणार आहे.
सदर मानांकन नगर परिषद उदगीरचे अध्यक्ष श्री. बस्वराज बागबंदे, उपाध्यक्ष तथा स्वच्छता सभापती श्री, सुधीर भोसले व मुख्याधिकारी श्री. भारत राठोड यांच्या नेतृत्वाखाली मिळवण्यात आले आहे.
या यशात उदगीर नगर पालिकेचे स्वच्छता निरीक्षक, सफाई कर्मचारी, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आदींनी अहोरात्र मेहनत केली आहे. विशेषतः शहरातील प्रत्येक घरातील महिला भगिनी यांचे महत्वपूर्ण योगदान आहे तसेच येणाऱ्या काळात शहरातील नागरिकांच्या मदतीने स्वच्छता क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करून उदगीर शहराला अव्वल स्थान मिळवून देण्याचे मानस आहे असे नगराध्यक्ष श्री. बस्वराज बागबंदे यांनी सांगितले.