दयानंद कला महाविद्यालयात विद्यार्थ्यांना गोल्ड कार्डचे वितरण
लातूर (प्रतिनिधी) : दयानंद कला महाविद्यालयात दहावी मध्ये 77 टक्के पेक्षा जास्त गुण घेतलेल्या अकरावीच्या विद्यार्थ्यांना गोल्ड कार्डचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दयानंद शिक्षण संस्था नियामक मंडळ सदस्य मा. विशालजी लाहोटी, प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार श्री. हरीदास काळे, संस्था नियामक मंडळ सदस्य मा. विशालजी अग्रवाल महाविद्यालयाचे प्राचार्य शिवाजी गायकवाड , उपप्राचार्य अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ दिलीप नागरगोजे यांनी केले यात त्यांनी गोल्ड कार्ड वितरण या मागची भूमिका विशद केली. विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचा अधिक वापर करून त्यातील दुर्मिळ ग्रंथ, आत्मचरित्रे, मासिके, नियतकालिके यांचे वाचन करून एक नवी प्रेरणा घ्यावी असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नायब तहसीलदार हरीदास काळे यांनी असे प्रतिपादन केले की, लोप पावत चाललेली वाचन संस्कृती विकसित होण्यास गोल्ड कार्डच्या माध्यमातून खूप मदत होईल. जीवनात यशस्वी होण्यासाठी इयत्ता अकरावीपासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी प्रारंभ करावी. आजचे युग हे स्पर्धेचे असल्यामुळे विद्यार्थ्यांनी स्पर्धेत टिकून राहण्यासाठी निरंतर वाचन, मनन, चिंतन करणे गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचा अधिकाधिक वापर करून अधिकारी बनावे असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विशालजी लाहोटी अध्यक्षीय मनोगतात असे प्रतिपादन केले दयानंद शिक्षण संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असते. शिक्षण संस्थेचा सदैव हाच मानस राहिला आहे की या संस्थेतून अधिकाधिक डॉक्टर इंजिनिअर, प्रशासन अधिकारी, उत्तम कलावंत घडावेत हीच संस्थेची अपेक्षा आहे आणि हीच अपेक्षा या विद्यार्थ्याकडून पूर्ण व्हावी हीच सदिच्छा त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली. तसेच प्रमुख पाहुणे मा.विशालजी अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास साध्य करत असताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन आपल्या कुटुंबाची या महामारी च्या काळात काळजी घ्यावी असे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या मनोगत प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांनी असे प्रतिपादन केले की दयानंद कला महाविद्यालय सदैव विद्यार्थ्यांच्या हितासाठी विविध उपक्रम राबवत असते. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये महाविद्यालय सदैव हिरीरीने सहभाग नोंदवत असते. त्यामुळेच विद्यार्थी आज स्पर्धा परीक्षेत मोठ्याप्रमाणावर यश संपादन करत आहेत. असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघराज शेवाळे व साक्षी सगर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राजक्ता चौधरी यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.संजय कुलकर्णी, डॉ.संदिपान जगदाळे, प्रा. सुरेश क्षिरसागर, प्रा.विलास कोमटवाड, प्रा. शांता कोटे, प्रा.अंजली बनसोडे, प्रा.सुधीर गाढवे यांनी परिश्रम घेतले.