राष्ट्रीय समाज पक्षाची नगरपंचायत निवडणुकांची तयारी पूर्ण – बोडके
उदगीर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ, देवणी, जळकोट, चाकूर या चार नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या असून आदर्श आचार संहिता सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने स्वबळाचा नारा देत निवडणुकीसाठी उमेदवार चाचपणी आणि निवडणूक काळातील व्युह रचना आखण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष नागनाथ भाऊ बोडके यांनी जिल्हाभर बैठका लावून पक्षाची शक्ती वाढविण्यासाठी युवकांना प्राधान्य देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. सदरील निवडणुकीच्या संदर्भाने यदाकदाचित समविचारी पक्षासोबत आघाडी करायची झाल्यास स्थानिक नेते आणि पक्ष श्रेष्टी यांच्यामध्ये समन्वय साधून निर्णय घेता येऊ शकेल, असेही नागनाथ भाऊ बोडके यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
एकंदरीत राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, उमेदवारांनी आपल्या पक्षाची ध्येय धोरणे आपल्या गावातील प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचविण्याचे कार्य करावे. जेणेकरून पक्ष संघटन मजबूत होईल आणि भविष्यकाळात येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रीय समाज पक्ष हा निर्णायक ठरेल. असा विश्वासही त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलून दाखवला आहे. याप्रसंगी चारीही नगरपंचायतीच्या सर्व जागा आपण लढवणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.क् रासपच्या स्वतंत्र बाण्यामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाल्याची चर्चा राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.