ओमायक्राॅनच्या संदर्भात घाबरू नका, दक्षता घ्या,नियम पाळा – भारत राठोड
उदगीर (एल. पी. उगिले) : महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर कर्नाटकामध्ये सीमाभागात ओमायक्राॅन चे दोन रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर घाबरून जाण्यापेक्षा दक्षता घेणे जास्त गरजेचे आहे. शासनाच्या वतीने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन केले जावे. अर्थात सतत मास्क चा वापर, साबणाने हात धूत रहाणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, सोशल डिस्टंसिंग चे पालन करणे. यासोबतच कोरोना प्रतिबंधाच्या संदर्भाने प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करावे.
लसीकरणाला प्राधान्यक्रम द्यावे. असे आवाहन उदगीरचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी भारत राठोड यांनी केले आहे. लसीकरणाच्या संदर्भात कोणीही अफवा पसरवू नयेत, तसेच जास्तीत जास्त लसीकरण करून घ्यावे. सर्व आस्थापना प्रमुखांनी आपल्या आस्थापनेत कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले किंवा नाही? हे प्रत्यक्ष तपासून पाहावे. तसेच त्यांच्या संपूर्ण कुटुंबातील आठरा वर्षावरील सर्वांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. या अनुषंगाने ही मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा मुख्याधिकारी भारत राठोड यांनी व्यक्त केली आहे.
यासोबतच “स्वच्छता पाळा रोगराई टाळा” हा विचार सतत डोळ्यासमोर ठेवून स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. यापूर्वीही वेळोवेळी नगरपरिषदेच्या वतीने या संदर्भामध्ये नियमावली सांगितलेली आहे.त्याचे काटेकोर पालन करावे. घाबरून न जाता दक्षता घेऊन कोरोना चा प्रसार थांबवता येऊ शकतो. त्यासाठी दक्ष नागरिक बनावे. असेही आवाहन मुख्याधिकारी भारत राठोड यांनी केले आहे.