कंत्राटदाराला मागितली लाच;लेखापाल, लिपीकवरती एसीबीचा ट्रॅप
रेस्ट हाऊस मधील बंद खोलीत शिजले काय ?
महागाव (राम जाधव) : दीड वर्षापासून थकीत असलेली देयके मंजूर करण्यासाठी कंत्राटदारास २० हजाराची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईत प्रत्यक्ष ५ हजाराची लाच स्वीकारतांना लिपीक शेख मोहसीन आणि त्याचा सहकारी मुख्य लेखापाल मनोज भालेराव यांना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणात मुख्याधिकारी सूरज सुर्वे यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे काय याची कसून चौकशी करण्यात आली. मात्र त्यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचे प्रत्यक्ष पुरावे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना आढळले नसल्याची माहिती समोर आली आहे. तरीही सखोल माहिती घेण्यासाठी मुख्याधिकारी, लेखापाल आणि लिपिकास येथील विश्राम गृहावर चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी या तिघांची उलटतपासणी करीत आहेत. कंत्राटदार यांचे कृषी केंद्र व हार्डवेअर दुकान आहे. न.प ला त्यांनी मोटर पंप व साहित्याचा पुरवठा केला. मागील दिड वर्षापासून त्यांचे बिल प्रलंबित आहे. त्यांचा ५४ हजार ३१३ रू. रकमेचा धनादेश तयार आहे मात्र तो देण्यासाठी २० हजाराची मागणी आरोपीकडून करण्यात आली. कंत्राटदार यांनी या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तडजोडी अंती ५ हजाराची रक्कम स्वीकारताना दोघांना ताब्यात घेण्यात आले.
मुख्याधिकारी कार्यालयात हजर असताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने धाड टाकून दोघांना ताब्यात घेतले .ज्या देयकासाठी मुख्याधिकारी व लेखापाल यांची स्वाक्षरी आवश्यक असते त्यावर महागाव मुख्याधिकारी यांना चौकशी साठी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले गेले.बंद दार असताना उमरखेड आणि ढाणकी येथील मुख्याधिकारी अचानक आले आणि त्या खोलीत जावून भेट घेतली त्या दरम्यान बरेच काही शिजले असल्याचे समजते.मुख्याधिकारी कार्यालयात हजर असताना लाचलुचपत विभागाने लोकसेवक यांना रंगेहाथ पकडले.मात्र मुख्याधिकारी यांची थातूरमातूर चौकशी करून सोडून देण्यात आल्याने लाचलुचपत विभागाच्या या कार्यवाहीत मोठी आर्थिक उलाढाल झाल्याची चर्चा सुरू आहे.
चौकट
उमरखेड व ढाणकीचे मुख्याधिकारी महागावात कसे ?
अँटी करप्शनच्या ट्रप मध्ये महागाव येथील मुख्याधिकाऱ्यांचे नाव पुढे आल्याने उमरखेड आणि ढाणकी येथील मुख्याधिकार्यांनी महागाव विश्रामगृहावर धाव घेतली. लाचलुचपत विभागाचे पथक चौकशी करत असताना महागाव मुख्याधिकारी खोलीत असताना उमरखेड आणि ढाणकी येथील मुख्याधिकारी महागावात कसे व कुणाच्या परवानगीने चौकशी पूर्वी संत्वनपर भेटण्यासाठी आले याबाबत उलटसुलट चर्चा होत आहे.