गुरुगोविंद सिंग यांनी सामाजिक समतेचा पुरस्कार केला – डॉ. नारायण सूर्यवंशी

गुरुगोविंद सिंग यांनी सामाजिक समतेचा पुरस्कार केला - डॉ. नारायण सूर्यवंशी

अहमदपूर (गोविंद काळे) : “गुरु गोविंदसिंग यांनी खालसा पंथाची स्थापना करून समाजाला अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. तसेच समाजाला समतेचे महत्त्व सांगून धर्मतत्वांमार्फत समतेचा पुरस्कार केला “, असे प्रतिपादन शिरूर अनंतपाळ येथील शिवनेरी महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख डॉ.नारायण सूर्यवंशी यांनी केले.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयात विविध विभागाकडून विद्यार्थ्यांसाठी आभासी तथा दूरदृश्य (झूम ) प्रणाली द्वारे प्रबोधन पंधरवाडयाचे आयोजन करण्यात आले. आज दि. २० जानेवारी रोजी इतिहास विभागाच्या वतीने गुरुगोविंदसिंग यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर आभासी तथा दूर-दृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक तथा प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. नारायण सूर्यवंशी उपस्थित होते. ते पुढे बोलतांना म्हणाले की, गुरु गोविंदसिंग यांनी जात-पात, अंधश्रद्धा, सामाजिक अनिष्ठ परंपरा आदींना तिलांजली देऊन सामाजिक ऐक्य निर्माण करण्याचे कार्य केले. शीख धर्मामध्ये गुरुपरंपरा खंडित करून, ‘गुरु ग्रंथ साहिब’ या धर्मग्रंथाला गुरुचे स्थान देण्याचे कार्य गुरु गोविंद सिंह यांनी केले, असेही ते या प्रसंगी म्हणाले.

कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी गुरुगोविंद सिंग यांच्या जीवन व कार्यावर प्रकाश टाकून गुरू गोविंदसिंग यांच्या कार्याचे महत्त्व सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन इतिहास विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले तर आभार डॉ. संतोष पाटील यांनी मानले. यावेळी आभासी तथा दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी व इतिहासप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author