तगरखेडा येथे अखंड हरिनाम सप्ताह निमित्त मधुमेह व रक्तदाब तपासणी शिबिराचे आयोजन
औराद शहा (प्रतिनिधी) : दरवर्षाप्रमाणे यावर्षीही मौजे तगरखेडा येथे व्यासपीठ अधिकारी ह.भ.प.भागवत महाराज बोळेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली अखंड हरिनाम सप्ताह आणि गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.गेल्या ४३ वर्षापासून अखंड हरिनामाचा हा गजर अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तीमय वातावरणात आजतागायत अव्याहतपणे चालू आहे. सप्ताहानिमित्त गाथा पारायण,प्रवचन आणि कीर्तन या दैनंदिन कार्यक्रमासोबतच पंचक्रोशीतील भक्तांसाठी विविध शिबिर आणि स्पर्धांचे भव्य असे आयोजन केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून यावर्षीही मधुमेह, रक्तदाब तपासणी आणि कोवीड-१९ लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन शारदोपासक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षणमहर्षी विश्वनाथराव वलांडेगुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शारदोपासक शिक्षण संस्थेचे सचिव रमेशराव बगदुरे हे उपस्थित होते.शिवाय औराद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कामत, वैद्यकीय अधिकारी डॉ.वैभव कांबळे,डॉ.भारती मॅडम, डॉ.शरद मठपती,चेअरमन रमेश राघो,प्रा.सतीश हानेगावे, विजयकुमार रावजादे, सरपंच श्रीमती केवळाबाई सूर्यवंशी, उपसरपंच मदन बिरादार, वार्ताहर दीपक थेटे,बालाजी थेटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी रमेश बगदुरे,सतीश हानेगावे,संजय कामत यांची प्रबोधनपर भाषणे झाली.
उद्घाटकीय भाषणात वलांडेगुरुजी म्हणाले,आरोग्य हीच खरी संपत्ती असून प्रत्येकांनी आपल्या तब्येतीची काळजी घेणे गरजेचे आहे. मानवी जीवनात विज्ञान आणि तंत्रज्ञानासोबतच आध्यात्मिक उन्नतीसाठी अशा हरिनाम सप्ताहाचे आयोजनही तितकेच महत्त्वाचे आहे.तसेच गावातील तरुणांनी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून आपल्या गावासाठी जेवढे काही चांगले काम करता येईल तेवढे करावे,असेही ते म्हणाले.
सदरील शिबिराचे आयोजन उदगीर येथील मधुमेह तज्ञ डॉ. प्रशांत नवटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या शिबिरात जवळपास १५० लोकांची मधुमेह तपासणी करण्यात आली तर ९५ जणांनी कोरोनाची लस घेतली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार डॉ.शंकर कल्याणे यांनी मानले.
शिबिराच्या यशस्वितेसाठी माजी सरपंच शाहुराज थेटे,अशोक थेटे, व्यंकट यादवराव बिरादार,माधव व्यंकटराव बिरादार, बालाजी पाटील, नागेंद्र पाटील,ज्ञानेश्वर शेषराव थेटे,मनोज स्वामी, सुरेश पाटील यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.