धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा महिला आघाडीचे आंदोलन
महिलांवरील अन्यायाला वाचा फोडणार – सौ. स्वाती जाधव
औसा (प्रतिनिधी) : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी एका महिलेवर अन्याय केला असून त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, या मागणीसाठी भाजपा महिला आघाडीच्या वतीने प्रदेश उपाध्यक्षा सौ.स्वाती जाधव यांच्या नेतृत्वात औसा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. राज्यात आघाडी सरकारच्या काळात महिलांवर अन्याय-अत्याचाराच्या घटना वाढत असून त्याला वाचा फोडण्यासाठी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा सौ. स्वाती जाधव पाटील यांनी यावेळी बोलताना दिला.
यावेळी बोलताना सौ.स्वाती जाधव म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांनी एका महिलेवर अन्याय केला. पहिली पत्नी असताना दुसरीसोबत घरोबा केला. निवडणुकीचा अर्ज भरताना ही माहिती लपवून ठेवली.दुसऱ्या पत्नीसोबत राहून त्यांनी दोघीवरही अत्याचार केला. महिलेवर अत्याचार करणाऱ्याला मंत्रिपदी राहण्याचा अधिकार नाही. ज्याने महिलांना न्याय द्यायचा त्या मंत्र्यानेच अत्याचार करणे चुकीचे आहे. संसार उठवण्याचे काम त्यांच्याकडून झाले आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे. परंतु ते देखील शांतच आहेत.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या संख्येत वाढ झाली आहे. अगदी कोविड सेंटरमध्येही महिलांवर विनयभंग आणि बलात्कार झालेले आहेत. यासंदर्भात वारंवार निवेदने दिली, आंदोलने केली परंतु महिलांना न्याय मिळाला नाही. झोपेचे सोंग घेतलेले हे सरकार आहे. ते जागे होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांचा तात्काळ राजीनामा घेऊन चौकशी करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना हे निवेदन पाठवण्यात आले आहे. सौ. स्वाती जाधव यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात औसा तालुक्यातील महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग घेतला.