नैसर्गिक व सांस्कृतिक पर्यावरणाचे संवर्धन काळाची गरज – प्राचार्य डॉ. हरिदास राठोड
‘पर्यावरण प्रदूषण आणि व्यवस्थापन ‘ या ग्रंथाचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : पर्यावरणाचा मानव हा एक महत्वाचा घटक आहे. मानवी संस्कृती आणि पर्यावरण याचा घनिष्ठ संबंध आहे. त्याचे आजच्या काळात संवर्धन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन भूगोलाचे ज्येष्ठ अभ्यासक, सांस्कृतिक पर्यावरणाचे अभ्यासक प्राचार्य डॉ. हरिदास राठोड यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या भूगोल विभाग व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २२ डिसेंबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘ पर्यावरण प्रदूषण आणि व्यवस्थापन’ या विषयावरील या एक दिवसीय राष्ट्रीय ऑनलाइन परिषदेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव ज्ञानदेव झोडगे हे उपस्थित होते. तसेच उद्घाटक म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे भूगोल अभ्यास मंडळ सदस्य प्रो. डॉ. एम. पी. मानकरी तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री हावगी स्वामी महाविद्यालय उदगीरचे माजी प्राचार्य डॉ. बी.जी. वेळापूरकर यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना ग्रामीण महाविद्यालय वसंत नगर कोटग्याळ,ता.मुखेड येथील प्राचार्य डॉ. हरिदास राठोड म्हणाले की, वनीकरणाच्या माध्यमातून पर्यावरणीय प्रदूषणास आपण आळा घालू शकतो. परंतु मानसिक प्रदुषणावर आळा घालण्यासाठी आपल्या संस्कृतीचेच संवर्धन होणे आवश्यक आहे असे ही ते यावेळी म्हणाले.
याप्रसंगी स्वा.रा.ती.म.वि.नांदेडच्या भूगोल अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम. पी. मानकरी व हावगीस्वामी महाविद्यालय उदगीरचे माजी प्राचार्य व भूगोलाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. बी.जी. वेळापूरकर यांनी ही मार्गदर्शन केले. यानंतर झालेल्या शोधनिबंध वाचन सत्राच्या अध्यक्षस्थानी पर्यावरणाचे अभ्यासक डॉ. आर. एस. गवारे ( जळगांव) हे होते. तर डॉ. व्ही. बी. गणीपूरकर ( नांदेड ) , एन.पी. कदम ( लातूर) आणि उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी ( अहमदपूर ) यांनी या सत्रात शोध निबंधांचे वाचन केले.
या राष्ट्रीय ऑनलाईन परिषदेचा अध्यक्षीय समारोप पर्यावरण प्रेमी तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केला.
यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत ‘ पर्यावरण प्रदुषण आणि व्यवस्थापन ‘ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ. डी. एन. माने यांनी करून दिला तर सूत्रसंचलन ह.भ.प. प्रो.डॉ. अनिल महाराज मुंढे यांनी केले. आभार संयोजक डॉ. सचिन गर्जे यांनी मानले. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली. या राष्ट्रीय परिषदेस बहुसंख्य संशोधक, अभ्यासक, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.