शिक्षकांनी बालस्नेही बनावे – धनराज गिते

शिक्षकांनी बालस्नेही बनावे - धनराज गिते

नांदगाव केंद्राची शिक्षण परिषद, साई येथे उत्साहात संपन्न…

लातूर (प्रतिनिधी) : बालकांचा सर्वांगीण विकास शाळेतूनच होत असतो. बालकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असताना शिक्षकांनी बालक समजून घेवूनच शिक्षण प्रक्रिया सहज घडवून आणली पाहिजे. यासाठी शिक्षकांनी बालस्नेही बनले पाहिजे असे मत लातूर बीटचे शिक्षणविस्तार अधिकारी धनराज गिते यांनी व्यक्त केले.नांदगाव ता.लातूर केंद्राच्या वतीने २९ डिसेंबर रोजी साई येथे आयोजित शिक्षण परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख बालाजी कोळी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच सौ.सुमित्राताई माने, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्रीहरी पवार, उपसरपंच अमोल पवार, सूरज पाटील, माजी सरपंच ज्ञानेश्वर पवार, ग्रामसेवक राजेंद्र परमेश्वरे, सतीश सातपुते यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना ते म्हणाले की, शिक्षण प्रक्रिया ही निरंतर चालणारी असून जागतिक महामारी कोरोनामुळे मागील सुमारे दिड वर्ष शाळा बंद पण शिक्षण आॅनलाईन चालू असल्याने विद्यार्थ्यांचा भावनिक संपर्क शिक्षकांशी पूरेसा झाला नाही.परिणामी वर्गवार अपेक्षित संपादणुकीवर मोठा परिणाम झाला ती उणीव भरून काढण्यासाठी शिक्षकांना भाषा, गणित विषयाचे पायाभूत ज्ञान भक्कम करून क्रमिक अभ्यासक्रमाकडे जावे लागणार आहे.

या शिक्षण परिषदेत सुलभक नजीऊल्ला शेख,माधूरी वलसे,मंगल डोंगरे यांनी निपून भारत अभियान अंतर्गत मूलभूत साक्षरता व संख्याज्ञानावर आधारित मूलभूत अपेक्षित पायाभूत कौशल्यावर चर्चा व विचारमंथन उपस्थित शिक्षकांसोबत केले.तसेच या अभियानाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या राज्य ते गाव – शाळा पातळीपर्यंत गठित समित्या व संस्था त्यांची भूमिका व जबाबदारी यांची माहिती जाणून घेतली तसेच बाला उपक्रमातील २८ उपक्रम कमी खर्चात टाकावू वस्तूंचा वापर करून कसे पूर्ण करता येतील यावरही शिक्षण परिषदेत चर्चा घडवून आणली.

याबरोबरच केंद्रप्रमुख बालाजी कोळी यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शाळेत उपलब्ध असलेल्या भाषा, गणित, इंग्रजी पेटीतील साहित्याचा वापर करून क्रमिक अभ्यासक्रमा बरोबरच नवोदय, शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना उपयोगी अशी माहिती दिली.

यादरम्यान नांदगाव केंद्रातून सेवानिवृत्त झालेल्या श्रीमती शामला जोशी व अशोक जाधव यांचा सहकुटुंब सत्कार, सन्मान करुन त्यांना निरोप देण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जाधव एन.एन.यांनी तर आभार बिराजदार एस.एस.यांनी मानले. शिक्षण परिषदेच्या यशस्वीतेसाठी श्रीम.सय्यद एच.आय., श्रीम.गिरी के.एन., श्रीम.सलघंटे एस.के., श्रीम.शेख एन.एम., श्रीम.गायकवाड ए.बी., कु.मौजन ए.एस., श्री गोपाळ मूळे यांनी परिश्रम घेतले.

About The Author