पोलीस ठाण्यासमोरील दुचाकी गेली चोरीला
एकाच दिवसात १० वाहने पळविल्याच्या घटना
पुणे (योगीता कोरे) : शहरातून वाहन चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. वाहन चोरट्यांचे आता डेअरिंग इतके वाढले आहे की, आता त्यांना पोलिसांची भीती उरली नसल्याचे दिसून येत आहे. चक्क पोलीस ठाण्यासमोर पार्क केलेली दुचाकी चोरीला गेल्याचे उघड झाले आहे. वर्षअखेरच्या दिवशी ३१ डिसेंबरला शहरात तब्बल १० वाहन चोरीला गेल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यात ६ दुचाकी, २ तीनचाकी आणि २ चारचाकी वाहने चोरीला गेली आहेत. डेक्कन पोलीस ठाण्यासमोर विमलाबाई गरवारे शाळा येथे पार्क केलेली मोटरसायकल चोरट्याने चोरून नेली आहे. हडपसर येथील काळेपडळ रेल्वे लाईनलगत रोडच्या कडेला पार्क केलेली बसच चोरट्याने पळवून नेल्याचा गुन्हा हडपसर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. कोंढवा येथील शांतिनगरमधील राजगृही बिझनेस हब येथे पार्क केलेली फॉर्च्यूनर गाडी चोरट्याने चोरून नेली. बोपोडी येथील भाऊ पाटील रोडवरील कुंदन पॅराडाईज तसेच अप्पर बिबवेवाडी येथील राजीव गांधीनगर येथे रस्त्याकडेला पार्क केलेल्या दोन रिक्षा चोरून नेल्या. सोमवार पेठ, शुक्रवार पेठ, अप्पा बळंवत चौक, कोथरुडमधील शास्त्रीनगर, शिवतीर्थनगर, खराडी सावत वस्ती येथून दुचाकी चोरीला गेल्या आहेत. शहरात नोव्हेंबरअखेर १३५० वाहने चोरीला गेली आहेत.