चपातीत विषारी औषध घालून शेळीला मारले
पुणे (योगीता कोरे) : चपातीमध्ये विषारी औषध मिसळून ती शेळीला खायला देऊन तिचा मृत्यू घडवून आणला असल्याची फिर्याद एका महिलेने हडपसर पोलिसांकडे दिली आहे. या फिर्यादीवरून हडपसर पोलिसांनी गोंधळेनगर येथे राहणाऱ्या एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी गुनाबाई पंडित जोगदंड (वय ६६, रा. महात्मा फुले वसाहत, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना त्यांच्या घराजवळ शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुनाबाई जोगदंड यांनी एक शेळी पाळली होती. तिला आरोपी महिलेने चपातीमध्ये विषारी औषध मिसळून शेळीला खायला दिली. त्यामुळे शेळीचा मृत्यू झाला असल्याचा तिचा दावा आहे. हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आता या शेळीचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.