नवऱ्याचा नाद सोड नाहीतर ठार करेल!
पिंपरी (प्रकाश इंगवे) : पतीचे आणि शेजारी राहणाऱ्या महिलेचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून झालेल्या वादातून एकमेकांच्या घरात घुसून तोडफोड करत राडा घातला. तसेच माझ्या नवऱ्याचा नाद सोड नाहीतर खल्लास करेल ! अशी धमकी दिली. आळंदी-वडगावरोड येथे रविवारी (दि. २) सकाळी सहा ते सात वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणी दोन महिलांनी परस्परविरोधी फिर्याद दिली आहे. त्यानुसार एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीचे शेजारी राहणाऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय पत्नीला होता. त्यातून शेजारी राहणाऱ्या महिलेच्या घरातील सदस्य झोपले असताना एका महिलेने दरवाजावर लाथा मारून जोरात दरवाजा वाजवला. घरातील महिलेने दरवाजा उघडला असता घरात जबरदस्तीने घुसून घरातील महिलेला लाथाबुक्क्यांनी, हाताने मारहाण केली. महिलेच्या केसांना धरून बाहेर ओढत नेऊन विटा फेकून मारल्या. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. यात घरातील महिलेच्या पायाला दुखापत झाली आहे. याप्रकरणी मारहाण झालेल्या महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याविरोधात दुसऱ्या महिलेने फिर्याद दिली आहे. महिलेच्या घरात घुसून आरोपी महिलेसह तिच्या सासू आणि जावेच्या मुलीला हाताने, लाथाबुक्क्यांनी, पोटावर, पाठीवर मारहाण केली. विटा फेकून मारून घरातील टीव्ही फोडला. तसेच शिवीगाळ आणि दमदाटी केली. याप्रकरणी संशय घेणाऱ्या महिलेने चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास आळंदी पोलीस करीत आहेत.