कोरोनाच्या पार्श्वभूमीवर : नळदुर्गच्या श्री खंडोबाची महायात्रा रद्द

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर : नळदुर्गच्या श्री खंडोबाची महायात्रा रद्द

उस्मानाबाद (प्रशांत नेटके) : अणदूर पाठोपाठ नळदुर्गच्या श्री खंडोबा यात्रेला कोरोना महामारीचा फटका बसला आहे. २७ ते २९ जानेवारी रोजी भरणारी महायात्रा रद्द करण्यात आली आहे. या तिन्ही दिवशी मंदिर परिसरात संचारबंदी लागू करण्यात येणार आहे, मात्र प्रमुख मानकरी आणि पुजारी यांच्या उपस्थितीमध्ये सर्व धार्मिक विधी पार पडणार आहेत. मैलारपूर ( नळदुर्ग ) येथील श्री खंडोबा असंख्य लोकांचे कुलदैवत आहे. त्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यातून किमान पाच ते सात लाख भाविक यात्रेसाठी हजेरी लावत असतात. श्री खंडोबा – बाणाई विवाहस्थळ असल्यामुळे आणि जवळच भुईकोट किल्ला असल्यामुळे यात्रेला दरवर्षी मोठया प्रमाणावर गर्दी असते.

यावर्षीची यात्रा दि. २७ ते २९ जानेवारी रोजी भरणार होती. २८ जानेवारी रोजी छबिना निघणार होता. २९ जानेवारी रोजी कुस्तीचा फड रंगणार होता. मात्र कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यात्रा रद्द करण्यात आली आहे तसेच कुस्त्या होणार नाहीत. आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच यात्रा रद्द करण्यात आली आहे. २७ ते २९ जानेवारी दरम्यान मैलारपूर मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात येणार आहेत. तसेच व्यावसायीकांना दुकान लावण्यास मनाई करण्यात येणार आहे. याबाबत रविवारी झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत नियमावली वाचून दाखवण्यात आली. यावेळी पोलीस अधिकारी , आरोग्य विभाग, नगर पालिका कर्मचारी, मानकरी, पुजारी, लोकप्रतिनिधी व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

धार्मिक विधी पार पडणार

कोरोना महामारीमुळे महायात्रा रद्द करण्यात आली असली तरी सर्व धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. २७ ते २९ जानेवारी हे तीन मंदिर परिसरात संचारबंदी लागू करण्यात येणार आहे.नळदुर्ग व अणदुरच्या प्रत्येकी पंचवीस मानक-यांना या काळात पारंपरिक विधी करण्यासाठी प्रवेश देण्यात येणार आहे. यावेळी मैलारपूर मंदिराकडे येणारे सर्व रस्ते भाविकांसाठी बंद करण्यात येणार आहेत. बाहेर गावच्या भाविकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

About The Author