शिळा भात फेकून दिला म्हणून सासूने सुनेला केली बेदम मारहाण

शिळा भात फेकून दिला म्हणून सासूने सुनेला केली बेदम मारहाण

पिंपरी (योगिता कोरे) : शिळा भात तू खाल्ला की फेकून दिला, असे म्हणत वकील सासूने शिक्षिका असलेल्या विवाहितेला मारहाण केली. तसेच स्वयंपाक, कामधंदा येत नसल्याने शिवीगाळ व दमदाटी करून विवाहितेचा छळ केला. सांगवी येथे १५ सप्टेंबर २०१९ ते १४ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत ही घटना घडली. शिक्षिका असलेल्या विवाहितेने याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, तिचा पती आणि सासू (दोघेही रा. सांगवी) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्ह दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विवाहिता आणि आरोपी पती या दोघांचाही हा दुसरा विवाह आहे.

फिर्यादी महिला या शिक्षिका आहेत. फिर्यादी विवाहितेची सासू वकील असून पती एका खासगी शाळेत शिक्षक आहे. लग्न झाल्यानंतर आठ महिने व्यवस्थित संसार झाल्यानंतर आरोपींनी फिर्यादी विवाहितेला जाच व छळ सुरू केला. तुला स्वयंपाक, कामधंदा नीट करता येत नाही, असे वारंवार टोचून बोलून फिर्यादी विवाहितेला वेळावेळी अपमानीत केले. तसेच फिर्यादीच्या माहेरच्या लोकांना नावे ठेवली. शिळा भात तू खाल्ला की फेकून दिला, असे म्हणून आरोपी सासूने फिर्यादी विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण केली. दमदाटी करून शारीरिक व मानसिक छळ केला. या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.

About The Author