पोलीस व महसूल प्रशासनास गुंगारा देऊन वाळूमाफियांनी केले हायवाचे पलायन
अहमदपूर( गोविंद काळे ) : गेल्या तीन-चार वर्षापासून तालुक्यात वाळू माफियाचा धंदा तेजीत,राजरोसपणे चालत असून दि. 4 जानेवारी रोजीतर महसूल विभागाने अवैद्य वाळू वाहतूक करणारा हायवा पकडून पंचनामा केला. व अहमदपूर पोलीस ठाण्यात लावण्यास सांगितले. पुढे महसूल विभागाची गाडी मध्ये अवैध वाळूने भरलेला हायवा, पाठीमागे पोलिसाची गाडी अशा स्थितीत सदर वाळुचे वहान मध्यभागी असलेल्या महादेवाडी रस्त्याने गेला. पुढे कोठे तरी वाळू खाली करून पलायन केल्याची घटना घडली आहे. यामुळे तालुक्यात सर्वत्र पोलिस प्रशासन व महसूल विभागाच्या हातावर तुरी देऊन अवैधरित्या वाळूचा धंदा करणारा पलायन, पोबारा कसा होतो. याची उलट सुलट चर्चा ऐकावयास मिळत आहे.
याबाबत समजलेली अधिकृत माहिती अशी की, शिरूर ताजबंदचे मंडळ अधिकारी उत्तरेश्वर रामराव चव्हाण वय ५७ वर्षे यांनी अहमदपूर पोलिसात वरील प्रकरणी तक्रार दाखल केली असून यात त्यांनी नमूद केले आहे की, दि. 4 जानेवारी रोजी सकाळी 9:30 ते 10 च्या दरम्यान मला माहिती मिळाली की, अहमदपूर कडून शिरूरकडे अवैधरित्या वाळूचा हायवा येत आहे. म्हणून मी व परशुराम श्रीधर वैद्य तलाठी असे आम्ही दोघे जण पुरोहित पेट्रोल पंपाच्या नजीक उभा होतो. त्यावेळी आम्हाला MH 44 U 0787 या क्रमांकाचा हायवा दिसला . त्यास हात वर करून वाहन बाजूस घेण्यास सांगितले. त्यावेळी चालकांनी सदर वाहन बाजूला घेतले, व गाडीतून उतरून पळून गेला. थोड्यावेळाने एक इसम तेथे आला. त्यांनी आपले नाव मोतीराम शंकर कदम असे सांगून, सदर वाहनाचा मालक असल्याचे सांगितले. या वेळी सदर वाहनाचा तहसीलदार यांच्या समक्ष महसूल विभागाने पंचनामा केला.त्यात ०५ ब्रास वाळू अंदाजे 25890/ रूपयाचे दिसून आले. वाहन मालक मोतीराम कदम यांनी महसूल विभागाला जो दंड असेल तो भरण्याची ग्वाही दिली. त्यानंतर पोलिस प्रशासनही तेथे आले. सदर हायवा अहमदपुर पोलीस ठाण्यात लावण्याचे सांगितले. यावेळी वाहन मालकाने एका ड्रायव्हरला बोलावून घेतले. पुढे महसूल विभागाची गाडी, मध्ये वाळूचा हायवा पाठीमागे पोलिसाची गाडी अशा परिस्थितीत अहमदपुरकडे येत असताना मधेच महादेव वाडी पाटी जवळ सदर वाळूचे वाहन महादेव वाडी रस्त्याने गेले. तिथे कुठेतरी वाळू खाली करून गाडीसह चालक फरार असल्याचे समजते. याप्रकरणी अहमदपूर पोलिसात मोतीराम शंकर कदम व अनोळखी दोन इसमावर कलम 379,201,34 भादवी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल बालासाहेब परशुराम साळवे हे करत आहेत.