पोलीस असल्याचे सांगून पळवले दोन लाखांचे दागिने
पिंपरी (प्रकाश इगवे) : हातचलाखी करून सोन्याचे दागिने पळवून नेल्याच्या दोन घटना शहरात उघडकीस आल्या. याप्रकरणी वाकड आणि निगडी पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तींच्या विरोधात मंगळवारी (दि. ४) गुन्हे दाखल करण्यात आले. लक्ष्मण विठ्ठलराव देशमुख (वय ६४, रा. द्वारकानगर, नागपूर) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी देशमुख हे मंगळवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास कोकणे चौक, रहाटणी येथील एका मिठाईच्या दुकानातून मिठाई खरेदी करून घरी जात होते. त्यावेळी तीन अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले. त्यातील दोघांनी ते पोलीस असल्याचे भासवून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. आपण पोलीस इन्स्पेक्टर असल्याचे एका आरोपीने सांगितले. त्यानंतर फिर्यादीचे दागिने सुरक्षित पिशवीत ठेवण्याच्या बहाण्याने हातचलाखीने ते काढून घेतले. तिसऱ्या अनोळखी व्यक्तीने फिर्यादीचे लक्ष इतरत्र वेधून तीनही आरोपींनी फिर्यादीचे दोन लाख २० हजार रुपये किमतीचे ५५ ग्रॅम सोन्याचे दागिने पळवून नेले. तीन आरोपीपैकी एकाने तो पोलीस इन्स्पेक्टर असल्याचे सांगितले.
संजीव सोमनाथ बडगुजर (वय ५२, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. फिर्यादीची आई मंगळवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास प्राधिकरण येथे एका मेडिकल दुकानातून औषधे घेऊन घरी जात होत्या, त्यावेळी दोन दुचाकीवर दोन अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले. त्यांनी फिर्यादीच्या आईला थांबविले. समोर खून झाला आहे. अंगावर सोने घालून जाऊ नका, पुढे धोका आहे, असे सांगून आरोपींनी फिर्यादीच्या आईला घाबरवले.