पाली – प्राकृत पासून मराठी भाषेचा उदय – डॉ. सा. द. सोनसळे
अहमदपुर (गोविंद काळे) : मराठी भाषेचा उगम हा संस्कृत भाषेतून नसून पाली – प्राकृत भाषेतून झाला आहे,असे महत्वपूर्ण विचार डॉ. सा. द. सोनसळे यांनी मांडले. महात्मा गांधी महाविद्यालयातील मराठी विभाग आयोजित “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” निमित्त विशेष व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, मराठी भाषेला अडीच हजार वर्षाची समृद्ध व गौरवशाली परंपरा असल्यामुळे ती नामशेष होणार नाही. भारतीय भाषा परिवारामध्ये संवाद नसल्यामुळे एक प्रकारची तटबंदी निर्माण झाली आहे. वास्तविक भाषा परिवारात परस्पर संवाद निर्माण झाला तर मराठीसह सर्वच भारतीय भाषांचा विस्तार व विकास होईल. सोनसळे सरांनी मराठी भाषेचा, साहित्याचा, साहित्यिकांचा, व विचारवंतांचा वैभवशाली इतिहास अभ्यासपूर्ण व ओघवत्या शैलीमध्ये मांडला.
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य मेजर डॉ. एस. के. खिल्लारे यांनी मराठी भाषा व्यवहारांमध्ये न संकोचता वापरली पाहिजे, लिहिली पाहिजे व मराठी साहित्य वाचले पाहिजे. मराठी भाषेच्या भवितव्याबद्दल नको त्या शंका व चिंता व्यक्त न करता तिचे संवर्धन व संगोपन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय मराठी विभाग प्रमुख डॉ. अनिल कांबळे यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. यादव सूर्यवंशी तर आभार डॉ. बी. व्ही. नरवाडे यांनी मानले. कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य प्रा. औदुंबर मुळे यांचे लाभले. ऑनलाईन संपन्न झालेल्या या कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.